कोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३२ हजार १२३ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. जवळपास १०० च्यापुढे हा आकडा दिवसाला वाढत असल्याचे दिसून येत आहे. करण्यात आलेल्या दुहेरी चाचण्यांमुळे कोरोनाबाधितांचा गेल्या आठवडय़ात सतत वाढत राहिलेला आकडा गेले तीन दिवस शंभराच्या आसपास राहिला आहे. त्यातही रत्नागिरी, खेड, चिपळूण हे तालुके वगळता त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा ५००० च्यापुढे गेला आहे. तर मृत्यूंची संख्या १५० च्यावर पोहोचली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी आणखी ७६ करोना तपासणी अहवाल बाधीत आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एक हजार ९८५ रुग्ण करोनाबाधित आढळले असून मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ३० झाली आहे.जिल्ह्यात मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ९७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रायगड जिल्हा
रायगड जिल्ह्यात करोनाचे ५३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ४०८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३२ हजार १२३ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे.