कोरोना चाचणी संख्या नागपुरात वाढवावी - फडणवीस
नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची कोरोना चाचणी सुरु करावी. पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे.
नागपूर : महानगरपालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची कोरोना चाचणी सुरु करावी. पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे. या महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेने यासाठी व्यवस्था उभी करावी, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मनपात कोरोनाबाबतच्या आढावा बैठकीत केल्यात. आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी यांसह भाजपचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
नागपुरात सरुवातील कोरोनावर चांगलं नियंत्रण मिळवलं होतं, मृत्यूसंख्या ही फार कमी होती मात्र गेल्या न महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर दररोज पाच हजाररुग्णांची तपासणी करण्याची व्यवस्था करावी अशा सूचना फडवणीस यांनी दिल्यात. सोबतच मोठ्या संख्येने समोर येणाऱ्या रुग्णांसाठी कोव्हिडकेअर सेंटर, रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व्यवस्था असलेल्या खाटांची व्यवस्था करावी लागेल. घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपलब्ध करणे तसेच स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सामाजिक संस्था जर कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यासाठी तयार असेल तर त्यांची सांगड नॉन-कोव्हिड खासगी रुग्णालयांशी घालून द्या, असेही त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागपूर शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट यावर भर दिला जात आहे. ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आणि मृत्युसंख्याही वाढली. सद्यस्थितीत दररोज तीन हजार नागरिकांची कोव्हिड चाचणी केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ बघता भविष्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं. तर महापौर संदीप जोशी यांनी कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी मनपाच्या व्यवस्थेला सुदृढ करण्याची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त करताना यासाठी त्यांनी ‘औरंगाबाद पॅटर्न’ लागू करण्याची सूचना दिली.