महाराष्ट्रातील हा एकमेव किल्ला जिथे होतो जहाज बांधण्याचा कारखाना; कोकणातील वैभवशाली सुवर्णदुर्ग
Fort in Maharashtra: कोकणातील सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. जाणून घ्या या किल्ल्याची सविस्तर माहिती.
Maharashtra Suvarnadurg Fort : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास लाभलेला आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे सक्षीदार आहेत. प्रत्येक किल्ला हा भव्य आणि तितकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. असाच एक किल्ला आहे जिथे जहाज बांधण्याचा कारखाना आहे. सुवर्णदुर्ग असे या किल्ल्याचे नाव आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात हा किल्ला आहे.
सुवर्णदुर्ग अर्थात “गोल्डन फोर्ट”... सुवर्णदुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला आहे. बंदर आणि किल्ल्यामध्ये एक किमी अंतर आहे. बोटीद्वारे किल्ल्यावर जाता येते. साधारण 25 मिनिटांचा हा प्रवास आहे. सुवर्णदुर्ग किल्ला 4.5 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. किल्ल्याची उत्तर-दक्षिण लांबी 480 मी. आणि रुंदी 123 मी इतकी आहे.
नेमका कुठे आहे हा किल्ला?
अरबी समुद्रात मुंबई आणि गोव्याच्या दरम्यान दापोली जवळ एका छोट्या बेटावर सुवर्णदुर्ग किल्ला आहे. हर्णे बंदराच्या किनाऱ्यावर हा किल्ला आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ कनकदुर्ग नावाचा आणखी एक छोटासा किल्ला आहे. कनकदुर्गसह गोवा किल्ला आणि फतेहगड किल्ला हे तीन किल्ले प्रामुख्याने सुवर्णदुर्ग किल्ल्याचे संर्क्षण करण्यासाठी बांधण्यात आले होते. सुवर्णदुर्ग हे जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले होते. स्वराज्याच्या आरमारी इतिहासात या जलदुर्गांचे अनन्यसाधारण महत्व होते.
सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इतिहास
1660 मध्ये अली आदिल शाह दुसरा याचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ला ताब्यात घेतला. 1960 मध्ये सुवर्णदुर्ग किल्ला खऱ्या अर्थाने विकसीत करण्यात आला. हा किल्ला उभारण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांना जाते. आदिलशाहीच्या नौदलाने संरक्षणाच्या उद्देशाने बांधलेल्या या किल्ल्यावर जहाज बांधण्याचा कारखाना देखील होता. 1818 पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. 1818 नंतर सुवर्णदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
सुवर्णदुर्ग किल्ल्याची रचना
सुवर्णदुर्ग किल्ला जितका भव्य आहे तितकीच त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. शत्रूच्या हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला होता. पूर्वी जमिनीवरील किल्ला आणि सागरी किल्ला बोगद्याने जोडला जात होता. किल्ल्यावर जाण्यासाठी एक महादरवाजा आहे. महा दरवाजा हा गोमुखी पद्धतीचा आहे. महादरवाज्याच्या जवळील भिंतीवर हनुमानाची भव्य प्रतिमा कोरलेली आहे. महादरवाज्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आणखी एक खास दरवाजा आहे. या दरवाजातून एका वेळेस फक्त एकच माणूस आत येऊ शकतो एवढी जागा आहे. याला चोर दरवाजा असेही म्हणतात. हा चोर दरवाजा सागरी किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे. या किल्ल्यावर पाण्याच्या दोन विहीरी तसेच पाणी साठवण्यासाठी अनेक टाक्यांची देखील व्यवस्था आहे. या किल्ल्यावर जवळपास 35 तोफा आहेत.
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जायचे कसे?
सुवर्णदुर्ग किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी खेड हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. खेड स्टेशनपासून हा किल्ला 43 किमी अंतरावर आहे. स्टेशनच्या बाहेर खाजगी वाहनाने येथे जाता येते. तसेच हर्णे गावापर्यंत एसटी बसची देखील व्यवस्था आहे. हर्णे गावात पोहचल्यावर हर्णे बंदरातून बोटीनेच सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाता येते.