करोडो लीटर पाणी वाचविणारी राज्यातील एकमेव पालिका
प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : पाण्याचा अपव्यय करणारी नव्हे तर करोडो लिटर पाणी वाचवणारी राज्यातील एकमेव नगरपालिकेबद्दल तुम्हाला माहितेय का ? या पालिकेने पाण्याचे मीटर बसवून नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध करून देत असताना महिन्याला सहा कोटी लिटर पाण्याची बचत सुरु केली आहे. राज्यात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या जलसंपन्न आणि जलसाक्षर म्हणून शिरपूर पालिकेची ओळख निर्माण झालीयं.
२४ तास पाणी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपालिकेने शिरपूरच्या प्रत्येक घराला पाणी मीटर बसविल्याने दिवसाकाठी या पालिकेने २० लाख लिटर पाण्याची बचत सुरु केली आहे. नागरिकांना मुबलक आणि २४ तास पाणी उपलब्ध करून देत असताना मीटर लावून पाणी दिल्याने नागरिकांना पाण्याचं महत्व पटले आहे त्यांना लागेल तितकेच पाणी वापरायची सवय लागली आहे.
परिणाम सुखावणारे
ही पाणी पुरवठा योजना प्रामाणिकपणे राबवली गेल्याने तिचे दृश्य परिणाम सुखावणारे आहेत. आधी शिरपूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी एक कोटी ३० लाख लिटर पाणी लागत होते तीच प्रमाण आता २० लाख लिटरने खाली आले आहे.
वॉटर मीटरचा विमा
या वॉटर मीटरचा विमा उतरविण्यात आल्याने नागरिकांना त्याच्या नादुरुस्तीचा आणि चोरी झल्याचा भुर्दंड बसणार नाही याची काळजी पालिकेने घेतली आहे. पाणी उलपलब्ध करून देत असताना शिरपूर पालिकेने नागरिकांना वॉटर मीटर बसवून पाण्याचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे या पालिकेला देशातील नागरपालिकांसाठीचे अनेक बहुमान मिळाले आहेत.