ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास​, उस्मानाबाद : महाराष्ट्राचा उस्मानाबाद येथील वेगवान गोलंदाज राज्यवर्धन हंगर्गेकरने नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर त्याला आयपीएलच्या महालिलावातही चांगला भाव मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने 30 लाख बेस प्राईज असलेल्या अष्टपैलू राज्यवर्धनला आपल्या संघात घेण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये मोजले. पण... याच खेळाडूवर वयाची माहिती दडवून खोट काम केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.


भारताच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघात खेळणारा खेळाडू राज्यवर्धन हंगर्गेकर याने खोटं वय दाखवलं. मुळात 21 वर्षाचा असणारा हा खेळाडू मात्र 19 वर्ष खालील वयोगटातून वर्ल्ड कप खेळलाय.


याबाबत क्रीडा विभागाला तक्रार आली होती. त्यानुसार उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी केली. याबाबतचा अहवाल क्रीडा विभागाला पाठवण्यात आला. त्या अहवालावरून राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी एमसीए, बीसीसीआयला पत्र लिहून राजवर्धनवर कारवाईची मागणी केलीय.


बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात ओमप्रकाश बकोरिया यांनी म्हटलंय की, उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी राज्यवर्धन हंगर्गेकरच्या जन्मतारखेची पडताळणी केली. त्यांनी केलेल्या चौकशीत राज्यवर्धन हा उस्मानाबादच्या तेरणा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी आहे. 


शाळेतील दप्तरी नोंदीनुसार पहिले ते सातवीपर्यंत त्याची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 अशी होती. मात्र, आठवीत नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी अनधिकृतपणे राज्यवर्धनची जन्मतारीख बदलून 10 नोव्हेंबर 2002 अशी केली. याचाच अर्थ 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी राज्यवर्धन हंगकरचे वय 21 वर्षे होते.