राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय वाद भलत्याच वळणावर; ठाण्यात अघोरी विद्या आणि तंत्रमंत्राचा आरोप
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेच्या दोन्ही गटातील वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. आरोप प्रत्यारोप,एकमेकांविरुद्ध आंदोलने यानंतर आता चक्क तंत्र, मंत्र आणि अघोरी विद्येचा वापर केल्याचा दावा करण्यात आल्ये आपापसात वाद चिघळला आहे.
Jitendra Awhad Thane NCP : अजित पवार यांचा एक गट शिंदे फडणवीस सरकारसह सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय वाद आता भलत्याच वळणावर गेला आहे. अघोरी विद्या आणि तंत्रमंत्राच्या आरोप-प्रत्यारोपांवरून ठाण्यातलं राजकारण तापले आहे.
राजकारणात चक्क तंत्र, मंत्र आणि अघोरी विद्येचा वापर
एकमेकांविरोधात राजकीय आंदोलन करणा-यांनी आता चक्क तंत्र, मंत्र आणि अघोरी विद्येचा वापर सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली. शनिवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयात सत्यनारायण पूजेनिमित्त साफसफाई करताना खुर्चीच्या खाली लिंबू, विभुती, टाचण्या, हळद, कुंकू, तांदूळ ठेवलेले आढळले. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी आनंद परांजपेंचं नाव न घेता निशाणा साधला. तर स्वतःला बहुजनांचा नेता म्हणायचं आणि हातात गंडेदोरे घालायचे. काही नेत्यांच्या बंगल्यात काय प्रकार चालतात, याची शोध पत्रकारिता करा, असा पलटवार आनंद परांजपेंनी केला आहे.
ठाण्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट आक्रमक
ठाण्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिसले. छगन भुजबळांविरोधात ठाण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. बीड इथल्या सभेत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. पाचपाखाडी इथल्या पक्ष कार्यालयाबाहेर जितेंद्र आव्हाड समर्थकांनी भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. तर दुसरीकडे अजित पवार गटानं आव्हाडांचा पुतळा जाळला. महापालिका मुख्यालयासमोर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आनंद परांजपेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
शरद पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे अजित पवारांसोबत एकाच मंचावर उपस्थित
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे अजित पवारांसोबत एकाच मंचावर उपस्थित दिसले. हडपसरमधल्या विविध कार्यक्रमात पवार-तुपे एकाच मंचावर दिसले..चेतन तुपे सुरुवातीपासून शरद पवार गटात आहेत. मात्र त्यानंतर अनेकवेळा तुपेंनी अजित पवारांची भेट घेतली. शुक्रवारी झालेल्या पुणे जिल्हा आढावा बैठकीतही तुपे अजित पवारांसोबतच उपस्थित होते. आजही हडपसरमधल्या अनेक कार्यक्रमात तुपे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.