मुंबई : काँग्रेसची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. औरंगाबादचे सुभाष झांबड, जालन्यातून विलास औताडे, चंद्रपूरमधून विनायक बांगडे, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामंतांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांच्या तीन याद्या घोषित केल्या आहेत. मात्र त्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची नावे आलेले नाही. अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्नी अमिता चव्हाण यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले होते. मात्र पक्ष त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी आग्रही आहेत. विद्यमान खासदार राजीव सातव हेही लोकसभा लढण्यास अनुत्सुक आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. मात्र आतापर्यंत आलेल्या काँग्रेसच्या याद्यांमध्ये प्रमुख नेत्यांची नावे नाहीत. 


चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते विनायक बांगडे नशीबवान ठरले आहेत. काँग्रेस पक्षाच्या तिकिटाच्या गोंधळात बांगडे यांना पसंती मिळाली आहे. काँग्रेसने जारी केलेल्या सातव्या यादीत बांगडे यांना उमेदवारी घोषित झाली आहे. विनायक बांगडे यांचे घराणे निष्ठावान काँग्रेसी आहे. गेले दीड महिना शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देत त्यांना लोकसभा तिकीट देण्यासाठी काँग्रेसचा वडेट्टीवार गट वेगवान कामी लागला होता. अनेक विनंत्या आणि समिकरणांवर विचार झाल्यावर वडेट्टीवार गटाची मागणी धुडकावून काँग्रेसच्या निवडणूक समितीने ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विनायक बांगडे यांना उमेदवारी घोषित केली आहे. 


२२ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या काँग्रेसच्या सातव्या यादीत बदल करण्यात आले आहेत. राज बब्बर यांची जागा बदलण्यात आली आहे. राज बब्बर उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार नसून फतेहपुर सीकरीमधून राज बब्बर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. राज बब्बर यांच्याऐवजी मुरादाबादमधून मशहूर शायर आणि कवि इम्रान प्रतापगढी निवडणूक लढवणार आहेत.