२०१९ मध्ये बुलडाण्यात एसटी अपघातांचं प्रमाण वाढलं
एसटी आपला कारभार कधी सुधारणार ?
मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात गेल्यावर्षी तब्बल ९६ एसटी अपघात झाले. एसटीच्या बहुतांश बसगाड्या निकामी झाल्यानं गेल्या काही महिन्यात अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेली एसटी आपला कारभार कधी सुधारणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
गेल्या ३ जानेवारीला बुलडाण्यात एसटी अपघातात २३ शालेय विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी ५ विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर होती. गेल्या काही महिन्यात अशा एसटी अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. कारण देखभाल दुरुस्ती आणि पुरेशा यंत्रसामुग्री अभावी लालपरीची दुर्दशा झाली आहे. गेली ७० वर्षं प्रवाशांना सुखकर प्रवास घडवणाऱ्या एसटीची वाताहत झाली आहे. त्यामुळं जुन्या झालेल्या बसगाड्या लवकरात लवकर बदलाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
केवळ जुन्या आणि निकामी एसटी गाड्यांमुळेच अपघात होत नाहीत, तर रस्त्यांवरील खड्डे हे देखील अपघात वाढण्याचं प्रमुख कारण आहे. या वाढत्या अपघातांबाबत एसटी अधिकारी मात्र फारसं बोलायला तयार नाहीत. एसटीची सेवा सुधारावी, यासाठी महामंडळानं देखील लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा ही लालपरी धोक्याची घंटा ठरू शकते.