विशाल सवने, झी मीडिया, सातारा :  तब्बल दोन वर्षानंतर शड्डुचा आवाज घुमणार आहे. महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्तीला आजपासून सुरुवात झाली.  कोरोनामुळे दोन वर्ष ही स्पर्धा झाली नाही. मात्र यंदा संपूर्ण निर्बंध उठले आहेत. पुन्हा एकदा मैदान गाजवायला कुस्तीपटू सज्ज झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 900 कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर जवळपास 59 वर्षानंतर स्पर्धेचं नियोजन करण्याचा मान
सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. त्यामुळे यंदाचा उत्साह काही औरच आहे.


कसं आहे नियोजन
साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराज स्टेडिअममध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास 50 हजार प्रेक्षकही स्पर्धा पाहण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं जातंय. याच स्टेडिअममध्ये 5 आखाडे उभारण्यात आले आहेत. यातील तीन आखाडे गादी विभागासाठी आहेत. तर दोन आखाडे हे माती गटासाठी आहेत. तसंच खेळाडू, प्रशिक्षक, मान्यवर यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचा अंतिम सामना 9 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे. मानाची गदा खासदार शरद पवार यांच्या हस्ते विजेत्याला देण्यात येणार आहे.


मानाच्या गदेचा कोण आहे प्रबळ दावेदार
भूगाव इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी खिताबाचा मानकरी अभिजीत कटके यंदा या स्पर्धेत खेळणार नाही. अभिजीत कटके दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकदा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. भूगाव इथं झालेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात अभिजीत कटके याने पैलवान किरण भगत याचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली होती.


तर जालन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये बाला रफीक शेखनं कटकेचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली होती. यंदा मात्र सगळ्यांचे लक्ष किरण भगतवर असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सातारा किरण भगतचं होम ग्राऊंड असल्याने सगळ्यांच्याच नजरा त्याच्यावर आहेत. त्याबरोबर सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, आदर्श गुंड, सूजर निकम, कौतुक डफाळे यांच्याकडे देखील प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातंय. 


मात्र कुस्तीत कोणतीही गोष्ट आधीच ठरवणं हे घाईचं होईल. डाव प्रतिडावात क्षणात निकाल बदलतो. त्यामुळे आपल्याला 9 एप्रिलची वाट पाहावी लागणार .