`त्या` मैदानाचं काम सुरु होतं आणि अचानक सापडला `ऐतिहासिक` ठेवा...
मुंबईतील अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असणारे वरळीतील ‘महात्मा गांधी मैदान’ अर्थात वरळीतलं ‘जांबोरी मैदान’. या मैदानाचं रुपडं पालटण्यासाठी महापालिकेनं येथ काम सुरु केलं. हे काम सुरु असताना इथे एक ऐतिहासिक ठेवा सापडलाय.
मुंबई : वरळी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाने जांबोरी मैदानाचं रुपडं पालटायचं ठरवलं. त्यानुसार मैदानात विविध क्रीडा प्रकारांना पूरक अशा सुधारणा करण्याचं काम सुरु झालं.
चार महिने या मैदानाच्या विकासाचं काम सुरु होतं आणि येथे सुरु झालं एक अत्याधुनिक मैदान. १५ हजार चौरस फुटांचे एक स्वतंत्र क्रीडांगण, तर कबड्डी - बॅडमिंटनसह इतरही खेळ खेळता येतील असे कोर्ट, फुटबॉल मैदान, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी स्वतंत्र स्केटींग ट्रॅक, पदपथ, लाकडी उपकरणे असणारी खुली व्यायामशाळा उभी राहिली.
सूर्यास्तानंतर मैदान उजळून निघण्यासाठी पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, एलईडी दिव्यांनी झळाळणारे शोभिवंत झोके, एलईडी दिव्यांचा वापर केलेले आकर्षक नंबर गेम यासारख्या सोई-सुविधांची सोय झाली.
सापडली ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी
मैदानाचे हे काम सुरु असताना पालिकेला एक महत्वाचा खजिना सापडला. हा खजिना म्हणजे एक ऐतिहासिक ठेवाच आहे. हा खजिना आहे ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी. ही पाण्याची टाकी सव्वा लाख लीटर क्षमतेची आहे.
विशेष म्हणजे या टाकीची नोंद सरकारी दफ्तरात किंवा महानगरपालिकेच्या कागदपत्रांमध्ये नाही. सुमारे सव्वालाख लीटर पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या टाकीचा उपयोग आता वर्षा जल संचयनांतर्गत पावसाचे पाणी साठवण्यासाठी केला जाणार आहे. हेच पाणी नंतर 'स्प्रिन्कलर्स' द्वारे मैदानासाठी वापरले जाणार आहे.
मैदानावर पाण्याचे फवारे
मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना खेळताना धुळीचा त्रास होऊ नये, मैदानात ओलावा रहावा, खेळताना धूळ उडून खेळाडूंना त्रास होऊ नये, यासाठी मैदानात १४ ठिकाणी 'स्प्रिन्कलर्स' अर्थात पाण्याचे फवारे बसविण्यात आले आहेत. याद्वारे निर्धारीत वेळी मैदानात पाणी शिंपडले जाते. यामुळे मैदान अधिक क्रीडा पूरक होण्यास मदत होणार आहे.