श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथून या टोळीतील दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची रोकड, स्विफ्ट कार, मोबाईल असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथील एसबीआय (SBI) शाखेचं एटीएम फोडून सात लाखांची रोकड या टोळीने पळवली होती. चोरट्यांनी आपली ओळख पटू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला होता. त्यानंतर गॅस कटरने एटीएम फोडून २० मिनिटांत रोकड पळविली. 


या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी चार स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली. घटनास्थळी आरोपी नागपुरातून खरेदी केलेले ब्लॅंकेट विसरले होते. त्याच्या बिलावरून पोलिसांनी संबंधित दुकान गाठले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले. त्यानंतर चोरट्यांची टोळी उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले. 


त्यानंतर तीन दिवस गाजीयाबद येथील भोजपूर येथे तळ ठोकून पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली. स्विफ्ट कारच्या झाडाझडतीत पाच लाखांची रोख रक्कम, गॅस कटर, मोबाइल आढळून आला. या टोळीकडून आणखीही महाराष्ट्रासह इतर ठिकाणी फोडलेल्या एटीएमचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.