चोरी करायला गेले आणि आठव्या मजल्यावरुन थेट खाली पडले, एकाचा मृत्यू
चोरी करण्यासाठी दोन चोर बहुमजली इमारतीत शिरले, पण वॉचमन आल्याचं पाहताच...
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : डोंबिवली (Dombivali) खंबाळपाडा इथल्या केडीएमसीच्या (KDMC) बीएसयूपीच्या इमारतीत वायरिंग चोरी करण्यासाठी दोन चोर गेले होते. यात आठव्या मजल्यावरून पडून एका चोराचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतल्या खंबाळपाडा (Khambal Pada) इथं समोर आली आहे. मोहम्मद सलीम भाटकर असं या मृत आरोपीचं नाव असून तो सराईत गुन्हेगार होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकी घटना काय?
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजनेअंतर्गत डोंबिवली आणि खंबाळपाडा परिसरात इमारती उभारल्या आहेत. मात्र अद्याप लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे रिकाम्या असलेल्या इमारतींना गेल्या काही दिवसांपासून चोरट्यानी लक्ष केलं आहे.
या इमारतीच्या दरवाजे आणि ग्रीलही चोर चोरून नेले आहेत. इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंग चोरी करण्यासाठी अरफाह पिंजारी आणि मोहम्मद भाटकर हे दोन तरुण काल रात्रीच्या सुमारास इमारतीत शिरले. चोर इमारतीमध्ये शिरल्याचे वॉचमनला लक्षात आलं. वॉचमनने चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली.
वॉचमन आल्याचं पाहाताच चोरांनी घाबरून इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण पाईपवरुन खाली उतरताना मोहम्मद भाटकर आणि अरफाह पिंजारीही हे दोघंही इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन खाली पडले. यात मोहम्मद भाटकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अरफाह पिजारी हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाटकर याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला. मोहम्मद भटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात या आधी देखील चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.