Sanjay Raut : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारिसे (45) (journalist Shashikant Warishe) यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) राजापूर येथे शशिकांत वारिसे यांच्या गाडीला धडक दिल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कोल्हापूर (Kolhapur) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी पंढरीनाथ आंबेरकर यांच्या थार गाडीने वारिसे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. शशिकांत वारिसे यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात बातमी प्रसिध्द केल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.


या प्रकरणावरुन आता राज्यातील पत्रकारांसह राजकीय नेतेही आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेकेड लक्ष वेधले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. मलाही तुमचा शशिकांत वारिशे करु असा धमकी देणारा फोन आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


"मलाही आज दोनदा फोन येऊन गेला की हा मुद्दा तुम्ही उचलू नका. तुमचाही मुंबईत शशिकांत वारीशे करु अशी दोनदा फोनवरुन मला धमकी देण्यात आली. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही मी कोकणात जाणार आहे," असे संजय राऊत म्हणाले.


संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र


खासदार संजय राऊत यांनी वारीशे प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळत आहेत याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "मा. देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री म्हणून राज्यात ढासळणाऱ्या कायदा सुव्यस्थेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे राज्याच्या गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्या दिवसाढवळ्या खून पडावेत आणि संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा हे चिंताजनक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातली राजापूर येथील तरूण पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. या हत्येस अपघाताचे स्वरूप दिले गेले असले तरीही ही हत्याच आहे. पत्रकार वारिशे हे कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीविरूद्ध सातत्याने आवाज उठवत होते. ते याबाबत लिखाण करत होते आणि रिफायनरीचे समर्थक म्हणवून घेणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना धमक्या देत होते. रिफायनरीस कोकणातील जनतेचा विरोध आहे. आपले मत याबाबत वेगळे असले तरीही स्थानिक जनता रिफायनरीच्या विरोधात संघर्ष करते आहे. शशिकांत वारिशेसारखे पत्रकार लोकांना जागृत करत होते हे सत्य नाकारता येणार नाही. त्या वारिशे यांची हत्या होणं महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे. मी दोन गोष्टींकडे आपले लक्ष वेधू इच्छितो," असे संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 


देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचाही उल्लेख


4 फेब्रुवारी 2023 च्या आंगणेवाडी जत्रेत भाजपाची एक जाहीर सभा झाली त्या सभेत आपण ठासून सांगितले की नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतो आहे पाहू आणि आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाहीत तोच वारिशे यांची हत्या झाली हा योगायोग समजावा का? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.