रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या सप्तलिंग नदीतीतील डोहात ही दुर्घटना घडली. यामध्ये मुलगा, वडील आणि पुतण्याचा समावेश आहे. सुदैवाने एक जण यातून बचावला आहे. हे चौघेही मुंबईतून गावी आले होते. जनार्दन संभाजी पांचाळ  (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी तिघांची नावे असून प्रसाद पांचाळ सुदैवाने बचावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने अनेक चाकरमानी गावी आले आहेत. आंबवली येथील जनार्दन पांचाळ हेही सुट्टीनिमित्त गावी आले होते. ते मुंबईत शिक्षक होते. आपल्या कुटुंबासह सप्तलिंग नदीत आंघोळीसाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही डोहात बुडू लागले. काठावर असलेल्या इतर कुटुंबियांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. लाकडाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र फक्त प्रसाद काठीच्या सहाय्याने काठावर आला आणि अन्य तिघेही डोहात बुडाले.



घटनेची माहिती समजताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर येथे पाठवण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यात दुःखाचे सावट पसरले असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.