कोरोना : रुग्णालयातून गेलेले संशयित रुग्ण पुन्हा रुग्णालायत दाखल
मेयो रुग्णालयातून निघून गेलेल्यांपैकी तीन कोरोना संशयित रुग्ण परतले आहेत.
नागपूर : येथील मेयो रुग्णालयातून निघून गेलेल्यांपैकी तीन कोरोना संशयित रुग्ण परतले आहेत, अशी माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, रुग्णालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली होती. नागपूरच्या मेयो रुग्णालयातून शनिवारी कोरोनाच्या चार संशयित रुग्ण निघून गेले होते. चौथा रुग्ण पुन्हा दाखल होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र एच ठाकरे यांनी दिले.
नागपूरमधून निघून गेलेल्या चार कोरोना संशयित रुग्णांपैकी तीन रुग्ण परतले असल्याची माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात हे चार संशयित रुग्ण आले होते. या संशयित चारही रुग्णांना शासकीय मेयो रुग्णालयात दाखल केलं होतं. सकाळी अचानक कोणालाही काही कल्पना न देता ते निघून गेल्यानंतर आता मेयो रुग्णालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तीन रुग्ण परतल्यानंतर आता आणखी एक रुग्णही परतेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे या वॉर्डात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले, अशी चर्चा होती. यानंतर पोलिसांनी तातडीने या रुग्णांचा शोध सुरु केला. कालच संध्याकाळी या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एकाची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. तर उर्वरित चौघांचे रिपोर्ट आज उपलब्ध होणार आहेत.