...अन् वाघाने शस्त्रक्रियेनंतर कृत्रिम पंजा काढून टाकला
२०१२ साली मध्ये बहेलिया शिकाऱ्यांनी पळसगाव इथ लावलेल्या सापळ्यात साहेबराव वाघ अडकला होता.
नागपूर: नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये शनिवारी साहेबराव या वाघावर शस्त्रक्रिया करण्यात आली. २०१२ मध्ये शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात पाय अडकून साहेबरावचा पाय जायबंदी झाला होता. त्याच्या पायाची बोटे निकामी झाल्याने साहेबरावला तीन पायांवर चालावे लागत होते. यासाठी आज साहेबराववर शस्त्रक्रिया करून त्याला कृत्रिम पंजा लावण्यात आला. मात्र, शुद्धीवर आल्यानंतर वाघाने हा पंजा काढून टाकला. परिणामी पशुवैद्यकीय डॉक्टर सुश्रुत बाभुळकर आणि आंतरराष्ट्रीय डॉक्टरांचे अथक प्रयत्न निष्फळ ठरले. वाघाला कृत्रिम पंजा बसवण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग होता.
साहेबरावने शुद्धीवर आल्यानंतर हा पंजा काढून टाकला असला तरी आजच्या शस्त्रक्रियेमुळे पायाच्या दुखापतीमुळे त्याला आतापर्यंत होत असलेल्या वेदना बंद होतील, असा दावा डॉक्टरांनी केला. २०१२ साली मध्ये बहेलिया शिकाऱ्यांनी पळसगाव इथ लावलेल्या सापळ्यात साहेबराव वाघ अडकला होता. यावेळी त्याच्यासोबत असलेला दुसऱ्या वाघाचा शिकाऱ्याचा सापळ्यात अडकल्याने मृत्यू झाला होता. साहेबराव वाघ वनविभागाच्या टीमने केलेल्या प्रयत्नांमुळे वाचला होता. मात्र, सापळ्यात पाय अडकल्याने त्याची दोन बोटे निकामी झाली. त्यामुळे एका पायाने जखमी असलेल्या साहेबरावला गेल्या आठ वर्षांपासून तीन पायांवरच चालावे लागत आहे.
त्याची हीच वेदना देशातील आघाडीचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. बाभुळकर यांनी ओळखली व त्याला दत्तक घेताना त्याला नीट चालता यावे म्हणून कृत्रिम पाय बसविण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने गेल्यावर्षी त्याच्या पायाचे मोजमाप घेण्यात आले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याच्या मज्जातंतूशी संबंधित वेदना क्षमवण्यासाठी न्यूरोमा आणि संधीवातातून आराम मिळविण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया गोरेवाडा रेस्क्यू सेंटर येथे करण्यात आली होती.