मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवरील 6 लोकलच्या वेळेत बदल, वाचा बदललेले वेळापत्रक
Mumbai Local Train Time Table: मुंबई लोकलच्या वेळांमध्ये काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. 4 जानेवारीपासून हे बदल करण्यात आले आहेत.
Mumbai Local Train Time Table Updated From 4th January: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लोकलच्या वेळेवर अनेक मुंबईकरांचे पुढचे कार्यक्रम व ऑफिसचे गणित ठरत असते. लोकल वेळेत गाठली नाही तर पुढचे सगळे शेड्युल बिघडते. काहीजण तर वर्षानुवर्षे एकच लोकल पडकतात. या लोकलमध्ये अनेकांना जीवाभावाचे मित्रही सापडले आहेत. एकूणच मुंबईकरांचे वेळेचे गणित हे लोकलवर अलवंबून असते. मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर येतेय. पश्चिम रेल्वेवरील सहा लोकल फेऱ्यांच्या वेळेत 4 जानेवारीपासून बदल केला आहे. (Mumbai Local News Update)
पश्चिम रेल्वेने सहा लोकल फेऱ्यांच्या वेळेत 4 जानेवारीपासून बदल केला आहे. या लोकलच्या वेळेत काही मिनिटांचा बदल असला तरी प्रवाशांना वेळेत ऑफिस पोहोचण्यासाठी आणि वेळेच गणित बसवण्यासाठी पुन्हा धडपड करावी लागणार आहे. पश्चिम रेल्वेवरील सकाळी 8.01 वाजता सुटणारी विरार-चर्चगेट लोकल आता विरारहून 7.55 ला सुटणार आहे. म्हणजेच नेहमीच्या वेळेपेक्षा काही मिनिटे आधी लोकल सुटणार आहे.
दरम्यान, सकाळी 7.56 वाजता सुटणारी विरार-चर्चगेट लोकल सकाळी 7.59 वाजता सुटेल. तर, सकाळी 6.41 वाजता सुटणारी चर्चगेट-विरार लोकल सकाळी 6.32 वाजता सुटणार आहे. सकाळी 9.27 वाजता सुटणारी चर्चगेट-बोरीवली लोकल सकाळी 9.19 वाजता सुटेल. सकाळी ९.१९ वाजता सुटणारी लोकल सकाळी ९.२३ वाजता सुटेल. सकाळी ९.२४ वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल सकाळी ९.२७ वाजता सुटेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मुंबई लोकलवर गर्दीचा ताण वाढताना दिसत आहे. रेल्वे प्रशासनाने अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, मुंबई रेल्वे विकास महामंडळ यंत्रणांनी एकत्र येत प्रयत्न केले आहे. मात्र, तरीही अशा घटना घडताना दिसत आहेत. मुंबई उपनगरीय लोकलच्या गर्दीमुळं एकाच दिवसांत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कल्याण ते ठाणे दरम्यान प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास या डोंबिवली-कोपर दरम्यान ट्रेनच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, डोंबिवली आणि कोपर स्थानकांदरम्यान रुळांवरून पडल्यामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर, दिवसभरात कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान आणखी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रवाशांबद्दल माहिती समोर येऊ शकली नाही.