पेट्रोलपेक्षाही टॉमेटो महाग; इतर भाज्यांचे दरही कडाडले, वाचा मुंबईत काय आहेत नवे भाव?
Tomato Prices Hike: सर्वसामान्यांच्या जेवणात रोज वापरला जाणारा टॉमेटो सध्या भाव खातोय. गेल्या काहि दिवसांपासून टॉमेटोने शंभरी गाठली आहे.
Tomato Prices Hike: टॉमेटोचे दर गगनाला भिडले आहेत. दररोजच्या जेवणात वापरला जाणाऱ्या टॉमेटोने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत 1 किलो टॉमेटोसाठी 150 रुपये मोजावे लागत आहेत. यानुसार एका टॉमेटोची किंमत 16-17 रुपये इतकी आहे. मुंबईतील काही भागात टॉमेटो खराब विकत असल्याचंही निदर्शनास आले आहे. मान्सूनमुळं टॉमेटोची गुणवत्ताही खालावली आहे.
टॉमेटोच्या दरात वाढ
गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोसाठी अधिक दर मोजावा लागत आहे. सुरुवातीला 1 किलोसाठी 100 रुपये मोजावे लागत होते. तर, आता दर वाढून 150 पर्यंत गेला आहे. तर, येत्या काही दिवसांत टॉमेटोचा भाव 200 रुपयांपर्यंत जाण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.
120 रुपये किलो टॉमेटो
आकाराने लहान असलेली टॉमेटो, अर्धे कच्चे व पिवळ्या रंगाची टॉमेटोही 120 रुपये किलोने विकली जात आहेत. मंगळवारी बोरीवली, पवई, माटुंगा, ब्रीच कँडी, पेडर रोड, खार आणि वांद्रे पूर्व या भागात भाजीविक्रेते व दुकानात टॉमेटॉ 160 रुपये किलोने विकला जात होता.
अवकाळी पावसाचा बसला फटका
टोमॅटोची आवक कमी झाल्याने किंमती वाढल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर, एकीकडे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे. याआधी झालेला अवकाळी पाऊस आणि आता मान्सूनमुळं टॉमेटोच्या पिकाला फटका बसला आहे. वातावरण बदलामुळं मार्केटमध्ये कमी माल येत आहे, त्यामुळं भाज्यांचे भाव वाढले आहेत.
भाज्यांचे दर कडाडले
टॉमेटोव्यतिरिक्त इतर भाज्यांचे दरदेखील वाढले आहेत. 1 किलो आल्यासाठी 250 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत. दर रोजच्या वापरासाठी आता भाजीविक्रेते कोथिंबीर आणि मिरचीही द्यायला काचकुच करत आहेत. 1 किलो हिरव्या मिरच्या 200 ते 300 रुपये दरानुसार विकल्या जात आहेत. तर कोथिंबीरीसाठी 200 ते 350 रुपये किलो भाव आहे. म्हणजेच एक जुडी कोथिंबर घेण्यासाठी 60 ते 100 रुपये मोजावे लागतात.
फरसबीची किंमतही वाढली
तर एकीकडे बाजारात फरसबीची किंमतही वाढतेय. एक किलो फरसबीसाठी 120 ते 160 मोजावे लागत होते. मात्र आता एक किलो फरसबी 250 रुपयांना मिळत आहे. तर, एक लिंबू १२ ते १५ रुपयांना मिळत आहे.