चंद्रपूर / सांगली : सात महिन्यानंतर ताडोबा अभयारण्य  (Tadoba Sanctuary) पर्यटकांनी पुन्हा गजबजले आहे.  रोज २०० सफारी गाड्यांचं पर्यटन दिसून येत आहे. तर सांगलीतल्या चांदोलीतही (Chandoli) पर्यटकांच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामधून थोडा मोकळा श्वास घेत आता लोक पर्यटनासाठी बाहेर पडू लागल आहेत. ताडोबाच्या अभयारण्यातही आता पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. हरिण, वाघ. माकडे हे जंगलात वावरताना दिसत आहेत. त्यामुळे ताडोबा पुन्हा गजबजले आहे. मार्च महिन्यापासून बंद असलेलं ताडोबा खुलं झालंय. आणि दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं पर्यटकांची पावलं ताडोबाकडे वळू लागली आहेत. रोज दोनशेहून जास्त सफारी गाड्या सध्या ताडोबामध्ये येतायत. कोविड नियमांचं पालन करुन पर्यटन सुरू आहे. 


ताडोबामधलं बुकिंग हाऊसफुल्ल झाल्यानं या भागातल्या रोजगाराला आणि अर्थचक्रालाही गती मिळाली आहे. पर्यटन व्यवसाय हजारो हातांना रोजगार देणारं क्षेत्र आहे. ताडोबातली पर्यटकांची गर्दी म्हणूनच दिलासादायक आहे.



दरम्यान, कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेलं सांगलीतल्या चांदोलीचं पर्यटन एक नोव्हेंबरपासून सुरू झालं आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर चांदोली परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. 


चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, गुढे पाचगणी पठार ही इथली प्रमुख पर्यटन स्थळं आहेत. इथली रंगीबेरंगी फुलं, आल्हादक थंड हवा आणि विस्तीर्ण परिसर, असं इथलं नैसर्गिक वातावरण अनुभवताना, पर्यटकांच्या उत्साहात भर पडत आहे. तर पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक लघुउद्योगांनाही चालना मिळू लागली आहे.