Mumbai Trans Harbour Sea Link Bridge in Marathi:  भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि इतर भागांना जोडणाऱ्या ट्रान्सहार्बर लिंकचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (Mumbai Trans Harbour Sea Link) नागरी काम पूर्णत्वाकडे आहे. यावर्षातील नोव्हेंबरपर्यंत पूल सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ट्रान्सहार्बर लिंक हा देशातील सर्वात लांब सागरी पूल (Sea Link Bridge) असेल आणि ओपन रोड टोलिंग सिस्टमसह असलेला पहिला पूल ठरणार आहे. 


मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे कमी वेळेत प्रवास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ट्रान्स हार्बर (Mumbai Trans Harbour Sea Link) या 22 किमी लांबीच्या पुलापैकी 16.5 किमी लांबीचा भाग समुद्राच्या वर आहे. या पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हा प्रवास केवळ 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. केवळ नवी मुंबईच नाही, तर या पुलामुळे मुंबईहून पुण्याकडे होणाऱ्या प्रवासाला ही गती मिळण्यास मदत होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प NH 348 या राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे.  हा मार्ग पुढे मुंबई-पुणे एक्स्प्रेसने उड्डाणपुलावरून चिर्लेहुन ते पळस्पे फाट्यापर्यंत जोडला जाईल.


त्यामुळे मुंबईकरांना अवघ्या 90 मिनिटांत पुण्याहून मुंबई गाठणे (Mumbai-Pune) शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान MMRDA ने देशातील सर्वात लांब सागरी पूल विकसित करण्यासाठी 18,000 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि येत्या काही दिवसांत देशातील सर्वात लांब सागरी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. 


मुंबई ट्रान्स हार्बर ली लिंकची वैशिष्ट्ये


मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक 16.5 किमी लांबीचा डेक असलेला देशातील सर्वात लांब सागरी पूल असणार आहे. ज्यामध्ये ओपन रोड टोलिंग सिस्टम आहे. मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा हा 22 किलोमीटरचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. मुंबईहून एक तासात प्रवासी पनवेल-न्हावा-शेवा गाठू शकतात. मुंबई, नवी मुंबईच नव्हे, तर प्रवाशांना थेट पुण्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा आणि जलद होणार आहे. MMRDA कडून या पुलाचे काम केले जात आहे. या पुलावरून दररोज 70,000 वाहने वेगाने धावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास नक्कीच सुखकर होणार आहे. 


वाहतूक कोंडी कमी होणार...


लोकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कमी करण्यासाठी आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा सागरी पूल तयार करण्यात आला आहे. या पूलामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईतील लोकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.