नागपूर : नागपूरमध्ये भरधाव ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव येथे झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रिक्षातील सर्व प्रवासी माळेगाव येथे जात होते. सावनेरकडून माळेगावकडे रिक्षानं वळण घेताच नागपूरकडून सावनेर दिशेने येणा-या भरधाव ट्रॅव्हल्सने रिक्षाला जबर धडक दिली. त्यात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर सर्व गंभीर जखमी झाले. 


दरम्यान, अपघात होताच संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स पेटविली. पाहता - पाहता आगीने अख्खी ट्रॅव्हल्स भस्मसात झाली. यावेळी सावनेर पोलीस घटनास्थळी असून काहीच करू शकले नाही. 


जमावासमोर पोलिसांचे काहीएक चालले नाही. ट्रॅव्हल्स विझविण्यासाठी सावनेर नगर परिषदेचे अग्निशमन दल आले असता नागरिकांनी त्यांच्या दिशेने दगडफेक करून अग्निशमन दलाचा विरोध करीत त्यांना परत पाठविले. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता..तर हा अपघात होताच ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळाहून पसार झाला.