प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड :  स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्यागार वृक्षांची सध्या मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली शंभर वर्षं जुन्या झाडांची कत्तल होते आहे. याविरोधात खासदार संभाजी राजेंसह विरोधकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाडं तोडू नका...दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात हा आदेश दिला होता. एवढंच काय विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही झाडाचं पान तोडू देणार नााही म्हणत आरे मेट्रो कार शेडला स्थगिती दिली. पण आता छत्रपतींच्या राजधानीतच झाडं तोडली जात आहेत. 


केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्‍यमातून किल्‍ले रायगडच्‍या संवर्धनाचे काम हाती घेण्‍यात आलं आहे. त्यासाठी महाडहून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण केलं जातंय. त्यासाठी रस्त्यालगतची झाडं तोडली जातायत. 


तब्‍बल १३७ कोटी रूपये खर्चून या रस्‍त्‍यांचे रूदीकरण आणि कॉक्रीटीकरण केलं जाणार आहे. त्‍यासाठी झाडं तोडली जाणार असल्‍याची कबुली महामार्ग विकास प्राधिकरणाने दिली आहे. 
 
विरोधी पक्षनेते, प्रवीण दरेकर यांनी अधिवेशनात हा विषय मी उचलेन. आणि रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर अनावश्‍यक जी झाडं तोडली जात आहेत, ती तोडू नये अशा प्रकारचं आवाहन सरकारला करणार असल्याचं ते म्हणाले. नॅशनल हायवेच्‍या अंतर्गत हा रस्‍ता येत असल्‍याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून यावर उपाय करण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्याचंही ते म्हणाले.


महाड ते रायगड या रस्त्यावर वृक्षांची सुंदर कमान आहे. ही झाडं छाटली जाणार नाहीत, याकडे रयतेच्या राजांनी लक्ष द्यायलाच हवं.