सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू विजय नत्थु चौधरी (Vijay Chaudhary) हे नवे वर्ल्ड हेव्हीवेट चॅम्पियन (World Heavyweight Champion) ठरले आहेत. 'वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम' स्पर्धेत (World Police and Fire Game) कुस्ती गटात देशाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या विजय चौधरी यांनी ही दमदार कामगिरी केली आहे. कॅनडा पोलीस (Canada Police) दलातील गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हे वर्ल्ड हेव्हीवेट चॅम्पियन ठरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुस्ती खेळातील महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू आणि तीन वेळा 'महाराष्ट्र केसरी' विजेते आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरी यांनी उपांत्य फेरीत त्यांच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याचा सामना केला. त्यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी झाला. अटीतटीच्या सामन्यात चौधरी यांनी साहोताचा 11-08 अशा फरकाने पराभव केला.


अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर दहा गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01 ने जिंकत भारताला 125 किलो गटामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. यात विविध देशांतील पोलीस दलातील कर्मचारी सहभागी होत असतात. ऑलिम्पिक  आणि कॉमनवेल्थनंतर या स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू भाग घेत असतात. आता या महत्त्वाच्या स्पर्धेत विजय चौधरी यांनी देशाचं नाव उंचावलं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये वानवडी येथे अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा झाली होती. त्यामध्ये हरियाना, पंजाब व जम्मू-काश्मीरच्या कुस्तीपटूंना अस्मान दाखवत विजय चौधरी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच वेळी चौधरी यांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. 


जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते. पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या वेळेनुसार विजय चौधरी प्रशिक्षण घेत होते.