बीडमध्ये सरकारच्या तूर खरेदी आदेशाला केराची टोपली, शेतकरी निराश
राज्यात सर्वत्र एक फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरु करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही, बीड जिल्ह्यात पहिल्याच दिवशी माजलगाव वगळता अकरा खरेदी केंद्रांत तरू खरेदी सुरुच झालेली नाही.
बीड : राज्यात सर्वत्र एक फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरु करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही, बीड जिल्ह्यात पहिल्याच दिवशी माजलगाव वगळता अकरा खरेदी केंद्रांत तरू खरेदी सुरुच झालेली नाही.
शेतक-यांची निराशा
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सर्वत्र तुरीचे पीक जोमात आलं आहे. त्यामुळे यंदा चार पैसे हातात जास्त पडतील या आशेनं बळीराजा खूश झाला होता. मात्र सरकारनं अगोदरच तूर खरेदीला उशीर केला आणि आता बीड जिल्ह्यातल्या गेवराई, बीड, वडवणी, परळी, शिरूर, अंबाजोगाई, केज, पाटोदा, कडा, या ठिकाणी केंद्रच सुरु झालेली नाहीत. बहुतांश केंद्रांवर ग्रेडर नसल्यानं शेतक-यांची निराशा झाली आहे.
सरकारी आदेशाला केराची टोपली
नाफेडनं पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून दिली नसल्यानं, तूर घेऊन आलेल्या शेतक-यांना निराशेनं परत गावाकडे जावं लागलं. जिल्हा मार्केटिंग कार्यालय आणि नाफेडच्या अधिका-यांनी सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत, तूर खरेदी केंद्र सुरुच केलं नसल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.