हरिश मालुसरे, झी मीडिया मुंबई, Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्रातील मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराज राक्षेने फायनलमध्ये महेंद्र गायकवाडला चीत करत पराभवाची धूळ चारली. महेंद्रला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावं लागलं. सेमी फायनलमध्ये महेंद्रने उत्तर भारतात आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या सिकंदर शेखचा पराभव केला होता. सिकंदर शेख यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. सिकंदरच्या प्रसिद्धीच्या मानाने महेंद्र तसा सर्वांसाठी नवखा पैलवान होता. पठ्ठ्याने केलेला एका डावाने त्याचा विजय पक्का झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माती विभागातील पहिली सेमी फायनल महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात होणार होती. सर्व मैदान खचाखच प्रेक्षकांनी भरलं होतं, पहिली कुस्ती अखिल भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांसह  इ. मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आली. 
 
संबळ वाजलं, बजरंग बली आणि छत्रपती शिवाजी महाराज नावांचा जयघोषात कुस्तीला सुरूवात झाली. हजारोंच्या संख्येने आलेलं पब्लिक शांत बसलं होतं. कुस्तीला सुरूवात झाली, महेंद्र गायकवाडला पहिला गुण मिळाला, पहिली फेरी  संपायला 10 सेकंद बाकी असताना सिकंदरने दोन गुणांची कमाई केली. पहिल्याफेरीअखेर सिकंदर 2 गुण आणि महेंद्र गायकवाड 1 गुण. 


दोन्ही पठ्ठे एकमेकांना गुण मिळवून देण्याची संधी देत नव्हते. कुस्ती देखणी होती, निवेदकांनीही आपला पैलवानी कॉमेट्रीने वातावरण तयार केलं होतं. दुसरी फेरी चालू झाली, सिकंदरने आक्रमक पवित्रा घेतला आणि महेंद्रला बाहेर ढकलत आणखी एका गुणाची कमाई केली. दोघेही आपली वर्षेभर केलेली मेहनत पणाला लावत होते. डाव प्रतिडाव झाले तितक्यात चलाखीने महेंद्रने बाहेरची टांग डावच टाकत भरघोस 4 गुणांची कमाई केली. त्यावेळी सिकंदरच्या मार्गदर्शकांकडून चॅलेंज घेण्यात आलं. 


पंचांनी झालेला डाव पाहत महेंद्रला 4 आणि सिकंदरला 1 गुण दिला. आता पॉईंट झाले सिकंदर 4 आणि महेंद्र 5 त्यावेळी कुस्तीची 2 मिनिट बाकी होती. महेंद्र उचपुरा गडी त्याने सिकंदरला झुंजवलं आणि अखेरपर्यंत गुण घेऊन दिला नाही. शेवटी  6-4 ने सिकंदरचा पराभव झाला.  



दरम्यान, महाराष्ट्र केसरीच्या प्रबळ दावेदार मानला जाणारा सिकंदर महेंद्र गायकवाडकडून पराभूत झाल्याने चाहते नाराज झाले होते. सिकंदरने बाला रफिक शेख या मल्लाला अवघ्या 40 सेकंदात आस्मान दाखवलं होतं. त्याचा पराभव झाल्याने कुस्ती शौकिनांनाही सिकंदरला महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा उंचावताना पाहणं राहून गेलं.