मुंबई : Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्गाला (Sindhudurg) बसला असून देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरुन ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत.  या दुर्घटनेमध्ये एका खलाशाचा मृत्यू झाला तर तिन जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. याविषयी देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार काल दुपारी 3.30 वा. सुमारास आंनदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटी वाहून गेल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम ( रा. गढीताम्हणे, ता. देवगड ) या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी (रा. पावस, रत्नागिरी), नंदकुमार नार्वेकर (रा. कोल्हापूर), प्रकाश गिरीद (रा. राजापूर, रत्नागिर) हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर (रा .रत्नागिरी), विलास सुरेश राघव (रा. पुरळ - कळंबई, ता. देवगड), सूर्यकांत सायाजी सावंत (रा. हुंबरठ, ता. कणकवली) हे सुखरुप बाहेर आले आहेत.


दरम्यान, रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी, निरज यशवंत कोयंडे यांची, आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण 7 खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. 


स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरु आहे. तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली. हे खलाशी हे मौजे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरुप असल्याचे सांगण्यात आले.