काँग्रेसला मोठा धक्का; उमेदवारांचे अर्ज बाद
निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच औरंगाबाद शहरातून काँग्रेस हद्दपार झाल्याची चर्चा
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आघाडी कोलमडली असल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच औरंगाबाद शहरातून काँग्रेस हद्दपार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला.
गुन्ह्यांचा रकाना रिकामा सोडल्याने हा अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. याबाबत न्यायालयात जाण्याची तयारी गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांचा एक अर्ज अपक्ष म्हणून तर दुसरा काँग्रेस उमेदवार म्हणून होता, मात्र हे दोन्ही अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
रमेश गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक गटाचे आहेत. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्यांनी गुन्ह्यात लागू नाही हा कॉलम तसाच सोडून दिला, मात्र त्यात टिक मार्क करणे आवश्यक असल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केला.