नागपुरात एकाच रात्री दोघांची हत्या
नागपुरात एकाच रात्री हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे खळबळ उडाली. दोघांची हत्या करण्यात आली आहे.
नागपूर : शहरात एकाच रात्री हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे खळबळ उडाली. अजय रामटेके व समीर शहा अशी मृतकांची नावं असून एका प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत तर दुसऱ्या घटनेतील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन हद्दीत एका चायनीज कारागिराची हत्या झाली. अजय रामटेके हा त्याच्या भावासह मित्र राहुल वंजारीकडे गेला होता. तिथे अजयचा भाऊ विजय याचा आरोपी राहुलशी वाद झाला.
वादानंतर विजय तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अजय रामटेकेला आरोपी राहुलने निर्जनस्थळी बोलावून चार पाच साथीदारांकरवी हत्या केली. आरोपी राहुल वंजारीची खानावळ आहे. तो अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती आहे.
खुनाची दुसरी घटना जरीपटका भागात घडली. समीर शाह या २१ वर्षीय युवकाचा तीन आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. पैशाच्या वादातून ही हत्या झाली.
याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासोबत शेख फय्याज व ऋषभ खापेकर या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
एकाच रात्रीत झालेल्या या दोन घटनांनी नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात येत आहे.