कडेगाव- वांगी अपघातात देशानं दोन राष्ट्रीय मल्ल गमावले
सांगलीमध्ये ट्रॅक्टर आणि क्रूझरला भाषण अपघात झाला. या भीषण अपघातात सहा पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर सहा पैलवान गंभीर जखमी झालेत.
सांगली : सांगलीमध्ये ट्रॅक्टर आणि क्रूझरला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सहा पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर सहा पैलवान गंभीर जखमी झालेत.
जखमींवर जवळच्या मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगलीतल्या कडेगाव- वांगी येथील शिरगाव फाट्यावर रात्री बारा वाजल्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातात क्रूझरचा अक्षरश: चेंदामेंदा झालाय. मध्यरात्री तात्काळ उपचाराची सोय न झाल्याने पैलवानांचा मृत्यू झाल्याचे एका जखमी पैलवानाने सांगितले.
मृतांची नावं...
या अपघातात विजय शिंदे, आकाश देसाई, शुभम घारगे, सौरभ माने, अविनाश गायकवाड, तर ड्राईवर रणजीत धनवडे यांचा मृत्यू झाला.
जखमींची नावं
तर अजय असुरडे, अनिल पाटील, तुषार निकम, प्रतीक निकम, रितेश चोपडे, अनिकेत गावडे, अनिकेत जाधव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमी असलेल्या पैलवनावर, मिरजेच्या शासकीय रुग्णालय आणि मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दोन राष्ट्रीय मल्ल गमावले
सातारा जिल्ह्यातील औंध येथे कुस्ती स्पर्धेतून परत येत असताना ह्या पैलवानावर काळाने घाला घातला. पैलवान शुभम घार्गे आणि पैलवान सौरव माने हे दोघे राष्ट्रीय मल्ल होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेतील सर्व पैलवान हे क्रांती कुस्ती संकुलातील आहेत. हे सर्व पैलवान औंध येथे कुस्तीसाठी गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात झाला.