नाशिक : पोटाच्या खळगीसाठी चिमुरडे करतायत खेळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सर्वत्र चौकाचौकात लहान मुलांना घेऊन भीक मागणाऱ्या महिला दिसतात. विविध सिग्नल्सवर हे चित्र कायम दिसतं. रेल्वेत तर अशा मुलांचा, महिलांचा वारंवार त्रासच होतो. पण नाशिकमध्ये सध्या दोन मुलं वेगळ्या पद्धतीने आपलं पोट भरतायत. 


हातावर चालणं, कोलांट्याउड्या मारणं, पाय दुमडून कसरती करणारी ही मुलं मैदानात किंवा सर्कशीत प्रदर्शन करत नाहीयेत. ही मुलं सिटी सेंटर मॉलजवळ, सिग्नलवर कसरती करत आहेत. दोन पैसे मिळावे यासाठी हे खेळ केले जातायत. अंगावर कपडा नाही अशा अवस्थेत रस्त्यावर भीक न मागता खेळ करून पैसे मिळवत आहेत. इतक्या लहान वयात ही मुलं पोटासाठी पैसे मिळवत आहेत. मात्र पोलीस, सरकारी यंत्रणा, शहरातील अनेक समाजसेवी संस्था यांना मात्र कोणतीही सोयरसुतक नाही. 


कॅमेरा दिसताच ही मुलं गायब होतात. मात्र प्रश्न उभा राहतो तो त्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या शिक्षणाचा... राजकीय घोषणांचा पाऊस, ब्लॅकमनीची चर्चा होत असताना या मुलांच्या भविष्यात मात्र अंधारच दिसतोय. महापालिकेचा महिला बालकल्याण विभाग आपली जबाबदारी झटकत सरकारी समाजकल्याणकडे बोट दाखवतोय. 


सध्या जिल्ह्यात काही संस्था अपघातग्रस्त प्राण्यांवर उपाचर करून देणार आहेत. त्यासाठी अँब्युलन्सही तैनात करण्यात आली आहे. मात्र अगदी कडाक्याच्या थंडीत या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या मुलांसाठी कोणीही पुढे येताना दिसत नाहीये.