सातारा : शरद पवारांना कमळांचा बुके दिलाय असं सूचक विधान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिल्यानंतर उदयनराजेंनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंनी विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणूक घड्याळावर की कमळावर लढवणार?' असा प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी हे सूचक विधान केलंय. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे नुसत्या सवलती नको असंही उदयनराजेंनी म्हटलंय.


उदयनराजेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजे भोसले हे सध्या सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. पण त्यांना २०१९ साली पुन्हा तिकीट द्यायला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा विरोध आहे. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत याचे पडसाद उमटले.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी विरोध केला होता. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली होती.


तर दुसरीकडे उदयनराजेंनी आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितलं होतं. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही उदयनराजे म्हणाले होते. परंतू, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी या बैठकीनंतर दिला होता.


उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यानंतर लगेचच ९ ऑक्टोबरला उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे संकेत उदयनराजेंनी दिले. मात्र साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं. आपल्यापेक्षा जास्त मतं पडलेला उमेदवार दाखवा, आपण त्याचा प्रचार करू अशा शब्दात त्यांनी सुनावलं. आपण सर्वांचेच लाडके आहोत पण पवारांचे जरा जास्तच लाडके असल्यामुळे भीती वाटते असा टोलाही त्यांनी लगावला.


उदयनराजे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.