UdayanRaje Bhosale : `महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी` उदयनराजे भोसले यांची मागणी
आपण ज्यांचं नाव (Shivaji Maharaj) सांगतो त्यांच्यावर चिखळफेक होत असताना आपण गप्प बसायचं का, उदयनराजे आक्रमक.
UdayanRaje Bhosale Satara News : "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayri) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज पुन्हा आक्रमक झालेले दिसले. उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक भूमिका मांडली. महाराजांचं नाव घेणाऱ्यांनी राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या विधानाबाबत भूमिका स्पष्ट करावी. मागे मला भरुन आलो म्हणजे मी हतबल झालेलो नाही. मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळेप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू", अशा शब्दात उदयनराजेंनी थेट इशारा दिलाय. (udayanraje bhosale is aggrieved by bhagat dingh koshayari controversial statement regarding the shivaji maharaj maharashtra politics)
उदयनराजे काय म्हणाले?
शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा ढाचा घालून दिला. अनेक देशांमध्ये अजूनही राजेशाही आहे. त्यांनी विचार केला असता तर अजूनही राजेशाही असती. मात्र राज्यकारभारात लोकांचा समावेश व्हावा, प्रतिनिधित्व मिळावं म्हणून अष्ट्रप्रधान मंडळाची निर्मिती केली. मात्र आज जो विचार महाराजांनी दिला होता. त्या विचाराच्या आधारावर सर्व जातीतील लोकं एकत्र आले. त्यामुळे स्वराज्य मिळालं. स्वराज्य म्हणजे लोकशाही. प्रत्यके प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष महाराजांचं नाव घेतात आणि आदर्श मानतात. माझ्यासह अनेकांना प्रश्न पडतो. सर्व धर्म समभावाची व्याख्या बदललीय का, सर्व धर्म समभाव म्हणजे महाराजाचं नाव घ्यायचं. ठिकठिकाणी महाराजांचा सर्व धर्म समभावचा विचार सांगता, तेव्हा प्रत्येक पक्षात असायला हवा. अजेंडा काहीही असो, जो पर्यंत तुमचा अजेंडा महाराजांचा विचार सांगतो, ते विचारच अमलात आणायचे नसतील तर महाराजांचं नाव कशाला घ्यायचं?
महाराजांनी त्या काळात दिलेल्या विचाराचा बारकाईने विचार करायला हवा. पाकिस्तान, हिंदुस्तान बांगलादेश तेव्हा अखंड होतं. त्याआधी महाराज जन्मले. जेव्हा विचारांचा विसर पडतो तेव्हा काय झालं? पाकिस्तान, हिंदुस्तान बांगलादेश वेगळे झाले. आज असंच चालत राहिलं, प्रत्येक जण वैयक्तिक, आणि प्रत्येक जण विशिष्ठ समाजाचा विचार करायला लागला तर समाजात तेढ निर्माण होणारच. पण तेव्हा 3 तुकडे झाले आता किती होतील याचा विचार करा. प्रत्येक राज्याचं रुपांतर हे देशाच्या स्वरुपात पाहायचं का तर नाही. महाराजांच्या विचारांनी देशाला अखंड ठेवलंय. आज आपल्याकडे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. मात्र याचा आपल्याला विसर पडला तर काय होणार? महाराजांनी प्रत्येकाचा सन्मान केला. प्रत्येक वेळेस महिला, वडीलधाऱ्या, प्रार्थनास्थळांचा सन्मान केला. आज त्यांचाच अपमान हा लेखणी आणि सिनेमाच्या माध्यामातून केला जातोय. तोंडात येईल ते बोललं जातंय. आपण इतके कोडगे झालोत का? आपण ज्यांचं नाव सांगतो त्यांच्यावर चिखळफेक होत असताना आपण गप्प बसायचं का?
लोकप्रतिनिधी म्हणून मला राज्यातील जनतेला, सर्व आमदार आणि खासदारांना विचारायचं की या मुद्द्यात राजकारण आणण्याचा संबंध नाही. महाराजांकडे आदर्श म्हणून पाहता. कोणतीही चळवळ असो याचं मूळ आणि प्रेरणास्थळ महाराज आहेत. ज्यांनी या चळवळी सुरु केल्या त्यांचाही अवमान आणि अपमान आहे. देशद्रोहाचा जो कायदा आहे त्याच्या अख्त्यारीत महापुरुषांची अपमान, लिखाण, विधानं करतील त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. नाहीतर भविष्यात काय होणारे? असंच सुरु राहिलं तर पुढच्या पिढीला आपण काय सागंणार हा प्रश्न आहे. याकडे कसं पाहितील याबाबत मला माहिती नाही. लोकांना वाटेल की ही फॅशन आहे. असं केलं तर चालतं, ही फॅशन आहे, असं वाटेल, यात काही गैर नाही, असं वाटेल. मग महाराजांचं नाव नका घेऊना.
मागे मला भरुन आलं, मी काही हतबल झालेलो नाही. बांगड्या घातलेल्या नाही. वेळेप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू. लोकांनी विचार केला पाहिजे. असं काही सुरु असताना लाज वाटली पाहिजे. ठाम भूमिका घेतली पाहिजे. लोकशाहीतील 4 महत्त्वाच्या स्तंभापैकी तुम्ही एक महत्त्वाचा स्तंभ आहे. माध्यमांनी या सर्वांना त्यांची भूमिका काय आहे हे विचारायला पाहिजे. हे सर्व जण त्यांचं नाव घेतात. नाहीतर नाव नका घेऊ. कुणीही राज्यपाल, राज्याचा प्रमुख असतो. त्यांनीही विधानं करायची. उद्या आणखी मोठ्या पदावरचा कुणी करेल, आपण खपवून घेणार का? असा संतप्त सवालही उदयनराजेंनी विचारला.