मी कधीच बेशिस्त नव्हतो; उदयनराजेंचे शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर
माझी कमिटमेंट ही लोकांशी आहे आणि शेवटपर्यंत राहील.
सातारा: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आलेल्या खोचक टीकेला उदयनराजे भोसले यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. ते सोमवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मी कधीच बेशिस्त नव्हतो. कोणाचाही स्वभाव हा एकसारखा नसतो. आपल्याकडे लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपापली मते मांडण्याची मुभा आहे.
कॉलर उडवणं बेशिस्त आहे का? पण मग आतापर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली नाही, ही शिस्त म्हणायची का? या सगळ्यावर मी उत्तरे देऊन झाली आहेत. स्टाईल इज स्टाईल यार, माझी कमिटमेंट ही लोकांशी आहे आणि शेवटपर्यंत राहील, असे उदयनराजे यांनी सांगितले.
उदयनराजेंच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तोंडभरून स्तुती केली होती. तसेच उदयनराजेंच्या प्रवेशामुळे भाजपला कसा मोठा फायदा होणार आहे, हेदेखील प्रसारमाध्यमांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवसेनेने उदयनराजे भोसले यांच्यावर खोचकपणे निशाणा साधला होता.
शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमित्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. याची कल्पना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल.
येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीवार्दाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले होते.