`1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण...`; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
Uddhav Thackeray And PM Modi Will Form Alliance: सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसचा समावेश असून सत्ताधारी गटामध्ये भाजपाबरोबर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाचा समावेश आहे.
Uddhav Thackeray And PM Modi Will Form Alliance: लोकसभेच्या निवडणूक कार्यक्रम 15 मार्चच्या आसपास जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून जोरदार प्रचारही सुरु केला आहे. ज्या राज्यांमध्ये युती करायची नाही अशा राज्यांमधील अनेक जागांची घोषणा भाजपाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रातील दौऱ्यांची संख्याही वाढल्याचं दिसत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा आहे तर दुसरीकडे महायुतीमधील आकडेमोड कशी असेल याबद्दलही तर्कवितर्क लावले जात आहे. अशातच उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येईल या? यासंदर्भातही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. मात्र याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील एका आमदाराने अगदी देत उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील असं म्हटलं आहे. लवकरच उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची भेट घेतील असंही या आमदाराने म्हटलंय.
5 वर्षात बऱ्याच घडामोडी
महाराष्ट्रामध्ये मागील लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत अनेक राजकीय धक्के देणाऱ्या घटना घडल्या आहेत. 2019 मध्ये लोकसभा एकत्र लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर वितुष्ट निर्माण झालं आणि त्यामधूनच महाविकास आघाडीचा जन्म झाला. मुख्यमंत्रीपदावरुन झालेल्या वादानंतर 2019 मध्ये भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र लढल्यानंतरही एकमेकांपासून फारकत घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं ज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष सत्तेत होते. तर सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपा विरोधी पक्ष झाला. यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. 2023 मध्ये मे महिन्यामध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसचा समावेश असून सत्ताधारी गटामध्ये भाजपाबरोबर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे मोदी एकत्र येणार
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूक ही दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरली आहे. या साऱ्या राजकीय गोंधळादरम्यान शिंदे गटाच्या आमदाराने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील असा दावा या आमदाराने आत्मविश्वासाने व्यक्त केला आहे. आता हा आमदार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, 'काय झाडी, काय डोंगार काय हाटेल.. ओके मध्ये आहे सगळं' फेम शहाजी बापू पाटील आहेत.
नक्की वाचा >> '...तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..'; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला
...म्हणून मोदी-ठाकरे एकत्र येतील
"1001% खात्रीने आज तुम्हाला सांगतो की, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार आहेत. आपला अंदाज चुकणार नाही," असं शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे आणि मोदी एकत्र का येतील याबद्दल बोलताना, "दिवस कुठला ते बघावं लागेल. पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही," असं शहाजी बापू पाटील एका मुलाखतीत म्हणालेत.
यात काहीच गैर नाही...
उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींकडे जावं लागेल तो दिवस लवकरच येणार आहे. राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. अशा वातावरणात उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपणही भाजपासह जावं तर त्यात काहीच गैर नाही," असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलं आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असा विश्वासही शहाजी बापू पाटीलांनी व्यक्त केला आहे.