नितेश महाजन, झी मीडिया, जालना : अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात कुठली सेटलमेंट झाली होती, याबद्दल उद्धव ठाकरेंनी खोतकरांना विचारणा केली. खुद्द अर्जुन खोतकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. अर्जुन खोतकर आणि माझ्यात दोन महिने आधीच सेटलमेंट झाली होती.असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जालन्यातील सत्कार सोहळ्यात केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दानवे आणि माझ्यात कोणतीही सेटलमेंट झाली नाही. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतरच आपण माघार घेतली, असं अर्जुन खोतकर म्हणाले. दानवे यांची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न आपण केला. यापुढच्या काळातही आम्ही एकमेकांची प्रतिमा जपू, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला.


रावसाहेब दानवे यांनी हा गौप्यस्फोट केल्यावर उद्धव ठाकरेंनी आपल्याला याबद्दल विचारलं. तेव्हा त्यांच्या कानावरही आपण ही बाब घातली, असं खोतकर यांनी सांगितलं. तसंच दानवे यांनी भाषणात मजा करताना सेटलमेंट झाल्याचं सांगितलं, असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं. विधानपरिषदेवर जाण्यासाठी तर खोतकरांची ही खेळी नाही ना, याची चर्चा आता यानिमित्तानं सुरू झाली.