उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा धक्का दिला आहे. पैठणचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Uddhav Thackeray Shivsena) प्रवेश केला आहे. त्यांच्यासह भाजपाचे डॉ राजू डोंगरे, एमआयएमचे डॉ शोएब हाश्मी यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. दत्ता गोर्डे यांचा पक्षप्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मातोश्रीवर तिघांचाही पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी गेले 4 दिवस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर फिरत होतो. करोना काळात मुख्यमंत्री असताना माझं कुटुंब, माझी जबाबदारी संकल्पना राबवली होती. आता महाराष्ट्र आणि देशावर आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब सोबत आहे की नाही हे पाहत होतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं की, "महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर दोन चक्रीवादळं आदळली. पण मागील 4 दिवसात मला दिसलं की, एक भगवं वादळ आता दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे आणि हुकूशाहीची चिरफाड करणार आहे".


"काहींच्या मनात इंडिया आघाडी, महाविकास आघाडी यांच्यात पर्याय कुठे आहे असा प्रश्न आहे. पण हुकूमशाहीला पर्याय द्यायचा नसते. आधी ती उखडून फेकून द्यायची असते, हाच पहिला पर्याय असते," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


"स्थानिक पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आपल्यासोबत आहेतच. पण भाजपातीलही अनेकजण शिवसेनेत येत आहेत. मुस्लीम मोठ्या प्रमाणात शिवसेनेत येत आहेत. जो काही संभ्रम निर्माण केला जात आहे तो खोटा असल्याचं दिसत आहे. 'मन की बात' आणि 'जन की बात' समोर येतच नाही. जनता संकटात असताना 10 वर्षात भाजपाने केलेला भोंगळ कारभार उघड पडला आहे. खोट्या कारभाराला संपवण्यासाठी तुम्ही सर्व शिवसेनेसोबत आला आहात. संटकाळात महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत असतो. याही संकटात महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे, ती म्हणजे हुकूमशाहीला गाडणं," असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 


"मराठवाडा संताची भूमी असून तिथे गद्दारांना थारा नसतो. मी रत्नागिरी, सिंधुदुर्गाचा दौरा केला असून लवकरच संभाजीनगर, जालना, मराठवाडा, विदर्भ येथे फिरणार आहे आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहे. एक एक जण गळपटत आहे, शरण जात आहेत. नितीश कुमार सुद्धा गेले, आणखी कोणी जातील. लाचार, भेकड आहेत त्यांनी जरुर जावं. पण महाराष्ट्रात हेकडांपेक्षा मर्द मावळे कित्येत पटीने जास्त आहेत हे दाखवून दिलं याबद्दल तुमचं अभिनंदन," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 


दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादीकडून 2019 मध्ये संदीपान भुमरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. 



दत्ता गोर्डे पैठणमध्ये संदीपान भुमरे यांच्याविरोधात संभाव्य उमेदवार असू शकतील. डॉ राजू डोंगरे वैजापूरमध्ये शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे विरोधात उमेदवार असू शकतात. तर डॉ शोएब हाश्मी, औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात उमेदवार असू शकतात. त्यामुळे या प्रवेशामागे उद्धव ठाकरेंची मोठी रणनीती असू शकते.