शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंचा बँकांनाही इशारा
औरंगाबाद : पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी करतानाच त्यांनी बँकांनाही इशारा दिला. शेतकऱ्यांना नोटीस दिल्या तर गाठ शिवसेनेशी आहे, असा दम देखील त्यांनी भरला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
'सरकार आलं तर सातबारा कोरा करेल. मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. सरकारने 10 हजार कोटी जाहीर केले आहेत. पण ते पुरेसे नाहीत. हे मलाही माहिती आहे आणि सरकारला ही माहित आहे. आता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे.' असं देखील उद्धव यांनी म्हटलं आहे.
'दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. शिवसैनिकांना आवाहन केलं आहे की, शेतकऱ्यांना घरापर्यंत मदत मिळावी यासाठी रस्त्यावर उतरा. कागदी घोडे नाचवू नका. शेतकऱ्यांना नोटीस पाठवली तर गाठ शिवसेनेशी आहे. सुरुवातीला 25 हजार शेतकऱ्याच्या हातात पडले पाहिजे.' असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.