`जागावाटपात उकिरड्यावरच्या कुत्र्यांना हाडूक फेकावे तशी शिंदे गटाची अवस्था`; ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Slams BJP Over Seat Sharing: `नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, पण त्याच वेळी रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दिलासा देण्यास नकार दिला. महाशक्तीच्या तेजस्वीपणाचे हे लक्षण आहे,` असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Uddhav Thackeray Group Slams BJP Over Seat Sharing: "आम्हीच खरी शिवसेना असा बोभाटा करणाऱ्या शिंदे-मिंधे गटाचे शेपूट अखेर भाजपच्या अजगराने गिळले आहे. मिंधे गटाकडे धड नव्हतेच. शेपूटच वळवळ करीत होते. ते शेपूटही अखेर संपले. भाजप म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे आता या चोर मंडळास कळले आहे. निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी बेइमानी करून गद्दार गटाच्या हाती शिवसेना व धनुष्यबाण सोपवला. त्यामुळे गद्दारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सत्य हे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचा डाव भाजपने पूर्णत्वास नेला हे आता स्पष्ट दिसते," अशी टीका भाजपावर 'सामना'मधून करण्यात आली आहे.
धनुष्यबाणच गायब केला
"मूळ शिवसेना (मिंध्यांचा फुटीर गट नाही) राज्यांत 23 लोकसभा मतदारसंघांत धनुष्यबाणावर निवडणुका लढत असे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात धनुष्यबाणाचाच बोलबाला होता, पण मिंधे गटास अर्ध्या जागाही मिळत नाहीत. ज्या आहेत त्यातील चार-पाच जागा गिळून भाजपने त्या त्या भागातून धनुष्यबाणच गायब केला. सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगडातून भाजपने धनुष्यबाण गायब केला. ठाणे-कल्याणमध्ये तरी तो राहील काय याबाबत शंका आहे. नाशिकमध्येही धनुष्यबाणाचे उच्चाटन भाजप करीत आहे. शिंदे-मिंधे गटात जे डरपोक खासदार मोहमायेच्या पाशात अडकून गेले, त्यातील अनेकांच्या उमेदवाऱ्या दिल्लीतील भाजप हायकमांडने कापल्या. स्वतःला ‘शिवसेना आमचीच’ म्हणवून घेणाऱ्या शेंदाड सेनापतींनी धनुष्यबाण वाचविण्यासाठी प्रतिकारही केला नाही. अर्थात प्रतिकार करण्यासाठी स्वाभिमान आणि हिंमत लागते, ती यांच्याकडे कवडीभरही उरलेली नाही," असा टोला ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला लगावला आहे.
कमळाला पंजाचाच आधार
"आता भाजपच्या ‘अनाजीपंत’ नीतीचा खेळ पहा. वर्धा लोकसभा अनेक वर्षे काँगेसकडे होती. महाविकास आघाडीच्या जागावाटपात वर्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांकडे आली. त्यामुळे तेथे त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला. देवेंद्र फडणवीस काल भाजप उमेदवारांचा ‘अर्ज’ भरण्यासाठी वर्ध्यात गेले व गरजले, ‘‘आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. आम्हाला येथून ‘पंजा’ गायब करता आला नाही, परंतु शरद पवारांनी वर्ध्यातून काँगेसचा ‘पंजा’ गायब करून दाखवला. आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले.’’ फडणवीसांनी पंजाची चिंता करू नये. काँग्रेस व इतर पक्षांतील सर्व छक्के आणि पंजे, सत्ते वगैरे भाजपात गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोठ्यात ‘पंजा’च चालतो आहे. कमळाला पंजाचाच आधार आहे. आमचा प्रश्न इतकाच आहे की, पवारांनी पंजाचे काय केले ते नंतर पाहू. हिंदुहृदयसम्राटांचा धनुष्यबाण तुम्ही महाराष्ट्राच्या अनेक भागांतून गायब केला आहे त्यावर बोला," असं आव्हान ठाकरे गटाने उपमुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
कुत्र्यांना हाडूक फेकावे तशी अवस्था
"निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी लबाडी करून शिवसेना व धनुष्यबाण चोर मंडळास दिला. आता चोरावर मोर होण्याचे काम भाजप करीत आहे. मिंध्या चोर मंडळास लोकसभेच्या जागा देताना उकिरड्यावरच्या कुत्र्यांना हाडूक फेकावे तशी अवस्था केली आहे. मिंध्यांच्या चार खासदारांना भाजपने उमेदवाऱ्या नाकारल्या व शेंदाड सेनापती दिल्लीतून शेपूट घालून परत आले. आता ज्यांना उमेदवाऱ्या वगैरे दिल्या जातील ते काही निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे धनुष्यबाण हे ऐतिहासिक चिन्ह महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून कायमचेच संपवले जाईल. भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षांपासूनचे हेच स्वप्न होते व गुज्जू व्यापार मंडळाच्या चरणाशी शिवसेना ठेवून मिंधे यांनी ते स्वप्न पूर्ण केले. हा धनुष्यबाण आणि मराठी माणसाचे एक भावनिक नाते आहे. कारण महाराष्ट्रद्रोही शक्तींच्या छाताडावर रोखण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनीच तो महाराष्ट्राला दिला. आज याच महाराष्ट्रद्रोही शक्तींनी मिंधे चोर मंडळाच्या सहाय्याने धनुष्यबाण गायब केला व हळूहळू चोर मंडळाने चोरलेली शिवसेनाही नामशेष केली जाईल," अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
महाराष्ट्रात अघोरी शक्तीचा वावर सुरू
"सुरत-गुवाहाटी येथे मिंधे महाशयांना ‘महाशक्ती’चा अभिनव साक्षात्कार घडला होता. आपल्यामागे महाशक्ती असून चिंता करण्याचे कारण नाही, असे ते बेइमान आमदारांना सांगत होते. त्या महाशक्तीने एका झटक्यात चोर मंडळाच्या चार खासदारांनाच उडवले व नंतर धनुष्यबाण गायब केले. तरीही हे चोर मंडळ महाशक्तीची आराधना करीत आहे. महाशक्ती खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करू शकते. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर कोर्टाने प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण राणांनी महाशक्तीची आराधना करताच व भाजपात प्रवेश करताच त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. राणांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, पण त्याच वेळी रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दिलासा देण्यास नकार दिला. महाशक्तीच्या तेजस्वीपणाचे हे लक्षण आहे. ही जी काही महाशक्ती आहे व ती खोट्यानाट्या, भ्रष्टाचाऱ्यांच्या मागे उभी आहे, जशी ती मिंध्यांच्या चोर मंडळाच्या मागे उभी राहिली. चोर मंडळाचे ईडी-सीबीआयपासून रक्षण केले. भ्रष्टाचाराला संरक्षण दिले, पण त्या बदल्यात शिवसेना व धनुष्यबाणाचे अस्तित्वच नष्ट केले. महाराष्ट्रात या अदृश्य, अघोरी शक्तीचा वावर सुरू आहे. पवारांनी वर्ध्यातून ‘पंजा’ गायब केला. मोदी-शहा-फडणवीसांनी बाळासाहेबांचा धनुष्यबाण गायब केला. जादूच झाली म्हणायची," असा खोचक टोला लेखाच्या शेवटी लगावला आहे.