Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony: "अयोद्धेतील राममंदिराचे राजकारण भाजपने अत्यंत विकृत वळणावर नेऊन ठेवले आहे. ते आपल्या संस्कृतीस शोभणारे नाही. हिंदुत्वाची ठेकेदारी आपल्याकडेच आहे व राममंदिराच्या सातबाऱ्यावर जणू आपलेच नाव लागले आहे, अशा थाटात भाजपचे लोक वावरत आहेत पण राममंदिर उभे राहात असताना ‘रामराज्य’ मात्र रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते," असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्याच विषयावरुन मंगळवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सरकावर टीका केली होती. अशाच पद्धतीची टीका ठाकरे गटाने केली असून भारतीय जनता पार्टीला लक्ष्य केलं आहे.


सामाजिक समतेचे वाभाडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अगदी महाराष्ट्राचेच बोलावे तर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्याही अश्रूंनी भिजल्या आहेत. एका यवतमाळ जिल्ह्यातच 48 तासांत 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पश्चिम विदर्भात वर्षभरात सव्वा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे निर्घृण राज्य करणारे लोक श्रीराम मंदिर सोहळ्याच्या राजकीय घंटानाद करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगार रोज आत्महत्या करीत आहेत व बहुदा या महान कामगिरीबद्दलच उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना ‘डॉक्टरेट’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जपानमधील एका विद्यापीठाने सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ही ‘डॉक्टरेट’ दिल्याचे समजते. राज्यात सामाजिक समतेचे व पुरोगामी विचाराचे वाभाडे निघाले आहेत. सध्या मराठा, ओबीसी व इतर समाजातील भांडणे विकोपाला जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामागे कोणाचे डोके व खोके आहेत ते महाराष्ट्र जाणतो," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.


संयमाची ऐशीतैशीच करून टाकली


"आता देवेंद्र फडणवीस यांच्यामागे ‘डॉ.’ अशी उपाधी लागेल. मुख्यमंत्री मिंधे यांनाही मधल्या काळात कुणा संस्थेने सामाजिक कार्याबद्दल ‘डॉ.’ पदवी दिली. पण विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांवर शेतकऱ्यांच्या नावापुढे ‘कै.’, ‘स्व.’ अशा उपाध्या लागल्या. त्यांची घरेदारे उजाड झाली. कुटुंबे अनाथ व पोरकी झाली. त्यावर सरकारमधले ‘डॉ.’ बोलत नाहीत. विदर्भात शेतकऱ्यांच्या आयुष्याचे स्मशान झाले व तिकडे कश्मीर खोऱ्यात जवानांच्या चिता पेटल्या आहेत, पण इकडे डॉ. फडणवीस वगैरे लोक पिचक्या मांडीवर थाप मारून सांगत आहेत, ‘राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? हिंमत असेल तर अयोध्येत या, तुमच्या छाताडावर मंदिर उभे केले आहे.’ राम म्हणजे संयम. राम म्हणजे सुस्वभाव, पण या लोकांनी संयमाची ऐशीतैशीच करून टाकली. जे लोक अयोध्येचा लढा सुरू असताना, शिवसैनिक बाबरीवर निर्णायक घाव घालत असताना मैदान सोडून पळून गेले ते रणछोडदास आता ‘हिंमत दाखवा’ वगैरे आव आणतात तेव्हा आश्चर्य वाटते," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


अशी पोस्टरबाजी हिंदूंना मान्य नाही


"राममंदिर तुमची खासगी संपत्ती आहे काय? असा प्रश्न विचारताच फडणवीस वगैरे लोकांना ‘मिरची’ लागायचे कारण नव्हते, पण प्रश्न खरा व झणझणीत असल्याने त्यांना झोंबला. प्रभू श्रीरामाचे बोट धरून विष्णूचे तेरावे (भाजप कृत) अवतार मोदी हे राममंदिरात निघाले आहेत अशी पोस्टरबाजी हिंदूंना मान्य नाही. मोदी हे रामापेक्षा मोठे झाले काय? असे पोस्टर दुसऱ्या कोणी छापले असते तर ‘हिंदुत्वाचा अपमान झाला होss’ अशा आरोळय़ा ठोकत भाजपने रस्त्यांवर घंटानाद व थाळीवादन केले असते. पण राममंदिरात मोदी निघाले आहेत व रामाने त्यांचे बोट धरले आहे हे चित्र भाजपास अस्वस्थ करीत नाही. राममंदिरासाठी शेकडो करसेवकांचे बलिदान झाले आहे व अनेक अज्ञात करसेवक शरयूच्या तळाशी छातीवर गोळ्या झेलून तपस्येला बसले आहेत. त्यांचे काही योगदान हे लोक मानणार आहेत की नाही?" असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.


मंदिर उद्घाटन करणारे अहंकारी व ढोंगी


"लालकृष्ण आडवाणी यांनी श्रीराम मंदिरासाठी अयोध्या रथयात्रा काढली नसती व त्यांनी पेटवलेल्या अग्नीत अशोक सिंघल, विनय कटियार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षमय समिधा टाकल्या नसत्या तर आजचे राममंदिर उभे राहिले नसते, पण भाजपला त्यांचे विस्मरण झाले. राममंदिराच्या लढ्यानंतर मुंबईत भडकलेल्या दंगलीत हिंदूंचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे राममंदिरात योगदान काय? असे विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही. बाबरीचे घुमट कोसळत असताना जे पलायनवादी झाले तेच आज हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत व हे ढोंग पाहून गंगा, यमुना, गोदावरी, शरयूचे पात्रही स्तब्ध झाले आहे. राममंदिर उभे राहात आहे हे आनंदाचे गाणे आहे व संपूर्ण देश ते गाणे गात आहे. राम अहंकारी नव्हता, पण मंदिर उद्घाटन करणारे अहंकारी व ढोंगी आहेत. श्रीरामाने पिताश्री दशरथाचा सन्मान राखला व वनवास पत्करला. इथे पिताश्री आडवाणी यांनाच वनवासी करून अयोध्येचा सात-बारा आपल्या नावावर करून घेतला जात आहे. असंख्य जुमलेबाजीच्या इतिहासात हे आणखी एक पान जोडले जात आहे," अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.


भाजपवाले रावणाचे व विभीषणाचे वंशज असावेत


"प्रभू श्रीराम हे सामान्यांचे, सत्याची कास धरणाऱ्यांचे दैवत. त्या दैवतासाठी लढा झाला. पण आता भाजपने जाहीर केले, “राममंदिर फक्त ‘व्हीव्हीआयपी’ म्हणजे अति विशिष्ट लोकांसाठी खुले राहील. त्यांनाच आमंत्रित केले जाईल.’’ असे सांगणारे हे रावणाचे व विभीषणाचे वंशज असावेत. रामाचे चरित्र हे हिमालयाच्या धवल शिखरासारखे आहे. भारतीय संस्कृती राम-लक्ष्मण, भरत, सीता यांनी बनविली आहे. भारतीयांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात रामचरित्र मानस आहे. रामचरित्र मानस म्हणजे भाजपची जुमलेबाजी नाही व अयोध्या म्हणजे अदानीची प्रॉपर्टी नाही. राममंदिराचा उद्घाटन सोहळा हे पवित्र मंगलमय कार्य आहे. मात्र भाजपने राजकीय चिखल निर्माण करून त्याचे मांगल्य व पावित्र्यच संपवले. ही विकृतीच म्हणावी लागेल," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.