राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राज ठाकरे मात्र VVIP यादीत
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय, विशेषत उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं बोलावणं नसेल हे जवळपास निश्चित झालंय. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे.
Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरुन महाराष्ट्रात एक वेगळाच सामना सुरु झालाय. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशातल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रित करण्यात येतंय. महाराष्ट्रातूनही अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रणं धाडण्यात आलीयेत. मात्र व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि एनडीएचे कधीकाळचे सहकारी असणा-या उद्धव ठाकरेंचं नावच नसल्याचं समजतंय. उद्धव ठाकरेंचं नाव व्हीव्हीआयपी यादीत का नाही याचा एक तर्क गिरीश महाजनांनी मांडलाय.
केंद्राच्या VVIP यादीत उद्धव ठाकरे नाहीत
एकीकडे उद्धव ठाकरेंचं व्हीव्हीआयपी यादीतून नाव गायब असताना राज ठाकरेंचं नाव मात्र यादीत असल्याचं समजतंय. खुद्द गिरीश महाजनांनी याबाबत सुतोवाच केलंय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून VVIP व्यक्तींना निमंत्रण धाडण्यात आली आहेत.. केंद्राच्या VVIP यादीत उद्धव ठाकरे नाहीत मात्र राज ठाकरे आहेत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलंय.. उद्धव ठाकरे फक्त पहिल्या टर्मचे आमदार आहेत. तसंच राम मंदिरावरुन टीका करणा-यांना बोलावण्याचं कारण काय असं वादग्रस्त विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलंय.
राम मंदिरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये सामना रंगला
राम मंदिरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये सामना रंगलाय. 'बाबरीचे घुमट कोसळताच पळून गेले' अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केलीय...तर भाजपनेही जोरदार पलटवार केलाय.. आम्ही 20 दिवस जेलमध्ये होतो तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते असा सवाल गिरिश महाजनांनी केलाय.
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला महिना उरलाय मात्र त्याआधीच महाराष्ट्रात एक वेगळाच सामना सुरु झालाय.राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला महिना उरलाय मात्र त्याआधीच महाराष्ट्रात एक वेगळाच सामना सुरु झालाय.
मुंबईहून थेट रामजन्मभूमी अयोध्येसाठी विमानसेवा
आता मुंबईहून थेट रामजन्मभूमी अयोध्येसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. इंडिगोनं मुंबई-अयोध्या आणि अयोध्या-मुंबई थेट फ्लाईटची घोषणा केलीय. 15 जानेवारीपासून मुंबई-अयोध्या थेट विमानसेवा सुरु होणार आहे. दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी मुंबईहून अयोध्येसाठी विमान रवाना होईल. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी अयोध्येत विमानाची लँडिंग होईल. अयोध्येहून मुंबईसाठी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी विमानाचं उड्डाण होईल, 5 वाजून 40 मिनिंटांनी मुंबईत लँडिंग होईल. 30 डिसेंबरपासून दिल्ली-अयोध्या आणि 11 जानेवारीपासून अहमदाबाद-अयोध्या विमानसेवा सुरु होतेय. आता थेट मुंबईहून अयोध्येसाठी विमानसेवा सुरु होत असल्यामुळे रामभक्तांसाठी ती पर्वणी ठरणार आहे.