`धन्य तो निवडणूक आयोग` म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मागितला 76 लाख मतांचा हिशोब! म्हणाले, `मोदी-शहांच्या...`
Maharashtra Voting: `परळीसारख्या मतदान केंद्रावर धनुभाऊचे गुंड लोकांना मतदान केंद्रावर फिरकू देत नव्हते. या झुंडशाहीचे चित्रण झाले. ही दहशत अनेक मतदारसंघांमध्ये झाली.`
Maharashtra Voting: "ज्याची लाठी त्याचीच म्हैस अशा पद्धतीची आपली लोकशाही आहे. भारताचा निवडणूक आयोग ही काठी असून, ही काठी सध्या मोदी-शहांच्या हाती असल्याने लोकशाहीची म्हैसही त्यांचीच आहे," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. 'सामना'च्या अग्रलेखामध्ये, "महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात 76 लाख मते वाढली. शेवटच्या तासा-दीड तासात व खासकरून मतदानाची वेळ संपता संपता 76 लाख मते वाढतात, मतदानाची टक्केवारी वाढते व या अचानक वाढलेल्या टक्केवारीवर भाजप व त्यांचे दोन बगलबच्चे सव्वा दोनशे जागा जिंकून महाराष्ट्रात सरकार बनवतात, हे रहस्य काय? अशी विचारणा महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली, पण निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शंका फेटाळून लावल्या व तासाभरात 76 लाख म्हणजे ‘पाऊण कोटी’ मते वाढणे सहज शक्य असल्याचा निकाल देऊन टाकला. हे मतदान शेवटच्या तासा-दीड तासात कसे वाढले याचा कोणताही तर्कशुद्ध खुलासा निवडणूक आयोग करू शकला नाही," असं म्हटलं आहे.
सरकारचे धाबे दणाणले
"तासाभरात ‘पाऊण कोटी’ मतदान कसे वाढले आणि त्यातही भाजप व त्यांचे मित्रपक्ष जिंकलेल्या जागांवर सरासरी 25 ते 30 हजार इतके मतदान अचानक कसे काय वाढले? हे प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत आणि सामान्य मतदारांनादेखील ते पडले आहेत. हेच प्रश्न हरयाणा विधानसभा निवडणुकीबाबतही निर्माण झाले होते. जर मतदान केंद्राबाहेर हजारो लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत, मतदान करण्यासाठी केंद्रावर झुंबड उडाली आहे असे चित्र असेल तर हे वाढलेले 76 लाख मतदान खरेच झाले असे मानता आले असते. त्याच संदर्भात पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रावरच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने ते कोर्टात सादर करायला हवे होते, पण पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने हरयाणा विधानसभा निवडणूक प्रकरणी असे सीसीटीव्ही फुटेज मागताच सरकारचे धाबे दणाणले व असा कोणताही रेकॉर्ड नागरिकांना देता येणार नसल्याचा आदेश जारी केला. हेच संशयास्पद आहे," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
फुटेज का नाकारले जात आहे?
"महाराष्ट्रात शेवटच्या तासाभरात ‘पाऊण कोटी’ मतदान वाढले हाच कळीचा मुद्दा आहे व निवडणूक आयोग इतकेच सांगते की, ‘‘हे होऊ शकते.’’ हे 76 लाख मतदार जमिनीतून बाहेर आले की हवेतून खाली पडले? मग मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज समोर का आणले जात नाही? हा सरळ मुद्दा आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या तक्रारीवर 60 पानांचे उत्तर दिले व 76 लाख मतदान वाढले ते बरोबर असल्याचे सांगितले. मग त्याबाबतचे पुरावे व मतदान केंद्रावरील फुटेज का नाकारले जात आहे?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.
आपण एक घटनात्मक...
"परळीसारख्या मतदान केंद्रावर धनुभाऊचे गुंड लोकांना मतदान केंद्रावर फिरकू देत नव्हते. या झुंडशाहीचे चित्रण झाले. ही दहशत अनेक मतदारसंघांमध्ये झाली. निवडणूक आयोगाने हे सर्व पाहिले नसेल तर त्यांच्या डोळ्यातला मोतीबिंदू वाढला आहे व त्यांनी त्यांची बुबुळे साफ करून घेतली पाहिजेत. निवडणूक आयोग म्हणतो, महाराष्ट्रातील निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या. त्यांचे म्हणणे आहे की, मतदानाची टक्केवारी बदलणे अशक्य आहे. निवडणूक आयोगाचा हा दावा म्हणजे निव्वळ सरकारची चमचेगिरी आहे. शरद पवारांचा पक्ष जे लोक अजित पवारांना व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जे थातूरमातूर एकनाथ शिंदेंच्या हाती सोपवू शकतात ते मोदी-शहांच्या जी हुजुरीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपण एक घटनात्मक संस्था असून देशात निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक घेण्याची आपली जबाबदारी असल्याचे भान सध्याच्या निवडणूक आयोगाला राहिलेले नाही," अशी टीकाही ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.
मतदान केंद्रावर संध्याकाळी पाचनंतर रांगा लागल्या नसतानाही...
"मोदी-शहांच्या सोयीचे हवे तसे करायचे व नियम मोडायचे किंवा बदलायचे यातच धन्यता मानणाऱ्या निवडणूक आयोगाकडून अपेक्षा ठेवणे चूक आहे. मतदार यादीतून हजारो नावे वगळली जातात व हजारो नावे घुसवली जातात. यात काही असाधारण आहे असे आमच्या निवडणूक आयोगाला वाटत नाही. अनेक झोपडपट्ट्यांतून भाजपचे स्वयंसेवक निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांच्या बोटांना शाई लावून हजार-पंधराशेत मतदानाला न जाण्याचा सौदा करीत होते. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणूनही डोळेझाक करणारा निवडणूक आयोग पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या बाता करतो आणि दुसरीकडे निवडणूक नियमांत तडकाफडकी बदल करतो. हे सगळे लोकशाहीला मारक आहे. निवडणुकांवरचा विश्वास उडेल अशा पद्धतीने नियम बदलून देशाच्या स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम निवडणूक आयोगाने चालविले आहे. यामुळे महाराष्ट्रातील मतदान केंद्रावर संध्याकाळी पाचनंतर रांगा लागल्या नसतानाही 76 लाख मते वाढली हा चमत्कार खरा आहे, असा दावा करणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाचा जय हो, असेच म्हणावे लागेल," असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे.
मुळात जनतेची फक्त एकच मागणी...
"मुळात जनतेची फक्त एकच मागणी निवडणूक आयोगाकडे आहे ती म्हणजे, महाशय, संध्याकाळी रांगा लागल्या व 76 लाख मते वाढली याचे फक्त सीसीटीव्ही फुटेज दाखवा. पण निवडणूक आयोग एका वाक्यात प्रश्न संपवतोय, ‘‘मोदी है तो मुमकीन है! 76 लाख मते आकाशातून बरसली हे मान्य करा.’’ धन्य तो निवडणूक आयोग," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.