Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच दुसरीकडे आज मनसेचे अभिजित पानसे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यामुळेच दोन्ही सेना एकत्र येण्यासंदर्भातील हलचालींना सुरुवात झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला नियोजित चिपळूण दौरा अचानक रद्द केल्याचा संदर्भही याच्याशी जोडला जात आहेत.


भेटीसंदर्भात पानसे काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पानसे आणि राऊत यांच्या भेटीनंतर राऊत हे 'मातोश्री'ला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भेटीसंदर्भात 'झी 24 तास'शी पानसे यांनी संवाद साधला. यावेळेस पानसे यांना शिवसेना भाजपा युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, "असं काही घडणार असेल तर मी नक्की तुम्हाला कळवले. माझी ही वैयक्तिक स्वरुपाची भेट होती. कुठलीही राजकीय चर्चामध्ये झाली नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय शक्यता व्यक्त करु नयेत," असं पानसे यांनी सांगितलं. ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार नाहीत असं समजायचं का? असा प्रश्न पानसे यांना विचारण्यात आला. त्यावर, "याबद्दल बोलण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे. यासंदर्भात स्वत: राजसाहेब सांगतील. मात्र सध्या जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ती पाहता आमच्या सर्वांचेच म्हणणं आहे की आता महाराष्ट्राने राजसाहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. वेळोवेळी राजसाहेबांनी वेळोवेळी ही भूमिका स्पष्ट केली आहे की मनसे एकटी लढत आली आहे. पुढील निर्णय होईल, न होईल यासंदर्भात सांगायला मी काही ज्योतिषी नाही," असं पानसे म्हणाले.


"राऊत यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होतो तेव्हा कळलं ते 'सामना'मध्ये आहेत तर तिथे भेटायला आलो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही," असं पानसे यांनी 'झी 24 तास'शी बोलताना सांगितलं. "शिवसेना-मनसे एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा मनसेच्या बैठकीमध्ये झाली नाही. महाराष्ट्रातील मतदारांशी जी थट्टा झाली आहे, त्याबद्दल चर्चा झाली. तसेच हे दोघे एकत्र येणार की नाही याबद्दल बोलायला मी छोटा कार्यकर्ता आहे. असा प्रस्ताव मागच्या वेळेस झाला तेव्हा कटू अनुभव आहे. मात्र पुढे काय होईल याबद्दल मी काही बोलू शकत नाही," असं पानसे म्हणाले.


राज ठाकरे कणखर नेतृत्व


राज ठाकरे कार्यकर्त्यांचं ऐकून मनसे-शिवसेना युतीबद्दल विचार करतील का? या प्रश्नावर पानसे यांनी, "कार्यकर्त्यांचं ऐकून राजसाहेब निर्णयापर्यंत पोहचणार नाहीत. मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राला कणखर नेतृत्वाची गरज आहे. हे निश्चितपणे राज ठाकरेंचं नेतृत्व आहे असा आमचा विश्वास आहे," असं उत्तर दिलं.



ठाकरे गटाच्या खासदाराचंही मोठं विधान


"मनसे-शिवसेना एकत्र यावी अशापद्धतीचे बॅनर्स मुंबई आणि इतर ठिकाणी लागलेले आहेत. मात्र तशाप्रकारची अद्याप कोणतीही चर्चा नाही," असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.  महाराष्ट्र नवनिर्माण सनेनं ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सुत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. मात्र स्वत: राज ठाकरेंनी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव ठाकरे गटाला देण्यात आलेला नाही असं स्पष्ट केलं आहे.


ठाकरे गटाचे आणि मनसेचे आमदार किती?


एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जून 2022 मध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार पक्ष सोडून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर केवळ 15 आमदार राहिले आहेत. तर दुसरीकडे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे आहेत. त्यामुळेच सध्या या दोन्ही सेनांचा एकत्र विचार केल्यास त्यांच्याकडे 16 आमदारांचं पाठबळ आहे.


बंडाच्या दुसऱ्या दिवशीच बॅनर


अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईमधील शिवसेनाभवनाच्या चौकात राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे असं आवाहन करणारे बॅनर्स झळकले होते. त्याचबरोबर आज म्हणजेच 6 जुलै रोजी नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अशीच बॅनरबाजी केली आहे.