`...तर पावसात भिजायची वेळ आली नसती`; उद्धव ठाकरेंची पवारांवर टीका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेची चर्चा महाराष्ट्रात होत आहे.
सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेची चर्चा महाराष्ट्रात होत आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेवरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे. सत्तेत असताना ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते साताऱ्याच्या माणमध्ये बोलत होते.
सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणूकही होत आहे. या निवडणुकीत भाजपने उदयनराजेंना तिकीट दिलं आहे.
साताऱ्याच्या सभेत बोलताना शरद पवारांनी आपण उदयनराजेंना तिकीट देऊन चूक केली मला माफ करा, असं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. निवडणुकीत विरोधकच नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, आम्हाला दुसऱ्या बाजूला तोडीचे पैलवानच दिसत नाही. आमच्या नेत्यांनी आजवर अनेक पैलवान तयार केले. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोधत नाहीत. येत्या २१ तारखेला सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सर्वांना समजेल, असे पवारांनी सांगितले.
साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरु असताना शरद पवारांनी भाषण केलं. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांचा हा उत्साह पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. पवारांचे हे रूप पाहून सर्वजण भारावले. कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.