हारतुरे-पुष्पगुच्छ काहीही नको; प्रतिज्ञापत्र आणा, उद्धव ठाकरे यांचे आवाहन
Uddhav Thackeray birthday : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.
मुंबई : Uddhav Thackeray birthday : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळं वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला होता आणि कोरोना निर्बंधामुळं शिवसैनिकांना पक्षप्रमुख भेटू शकले नव्हते. परंतु आज सर्व शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवर उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या सैनिकांना भावनिक आवाहन केले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमित्तानं मातोश्री निवासस्थानी फुलांची सजावट करण्यात आली. गेटवर मध्यभागी फुलांनी धनुष्यबाण साकारण्यात आला आहे. तसेच मातोश्रीच्या परिसरात शुभेच्छा देणारे बॅनर्सही लावण्यात आलेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कमकुवत झाली असली तरी सामान्य शिवसैनिकांनी मात्र मातोश्रीवर आज गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी हारतुरे, पुष्पगुच्छ, फोटोफ्रेम वगैरे काहीही नको. प्रतिज्ञापत्र आणा, असं आवाहन केलं होतं. त्यानुसार कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
वाढदिवसानिमित्त हार तुरे नको, प्रतिज्ञापत्र आणा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होते. त्याला प्रतिसाद देत अहमदनगरमधले कार्यकर्ते, पदाधिकारी प्रतिज्ञापत्र घेऊन मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी आलेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्यावतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. सारसबागेतील तळ्यातल्या सिद्धिविनायक गणपतीची शिवसैनिकांकडून महाआरती करण्यात आली.
कोल्हापूर शहरातून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने निष्ठा रॅली काढली. कोल्हापूर असतील दसरा चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छ..असं ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुका होऊ द्या, मग दाखवतोच असं आव्हान त्यांनी दिले आहे. मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असे त्यांनी म्हटले आहे. देशात ईडी सीबीआयचा गैरवापर केला जातोय असा आरोप त्यांनी केला. विरोधकांनी एकत्र येत पदाची लालसा न ठेवता लढलं पाहीजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा कडाडून हल्लाबोल केलाय.