Uddhav Thakceray Avoid Visit To Anand Ashram in Thane: शिवसेना (Shivsena) पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या (Thane) दौऱ्यावर गेले होते. मात्र या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) निष्ठावान शिवसैनिक आणि शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचं निवासस्थान असलेल्या आनंद आश्रम (Anand Ashram) मठात जाणं टाळलं. उद्धव ठाकरे हे टेंभी नाक्यावरील जैन मंदिरामध्ये गेले मात्र तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंद मठात न जाताच ते मुंबईला परतले. मात्र यामागे एक कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून या मुद्द्यावरुन टीका केली आहे. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे हे आज दुपारी ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर ते टेंभी नाक्यावरील जैन मंदिरामधील कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. याच मंदिराला काही दिवसांपूर्वी उद्धव यांचे चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट दिली आहे. आज उद्धव यांनी या मंदिरामधील कार्यक्रमानंतर थेट मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. या मंदिरापासून काही अंतरावरच आनंद दिघे यांचे निवासस्थान आहे. मात्र आनंद आश्रम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या निवासस्थानाच्या ठिकाणी सध्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्य कार्यालय आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी जाणं टाळलं का असा सवाल आता ठाण्यातील शिवसैनिकांबरोबरच शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडूनही विचारला जात आहे.


उद्धव ठाकरेंनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं का टाळलं?


शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे. आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार होते त्याआधी आज सकाळी या आनंद आश्रमावर 'बाळासाहेबांची शिवसेना' हा फलक उभारण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणं टाळलं असल्याचं बोललं जातं आहे. हा फलक लागला तेव्हापासूनच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती. घडलंही तसंच.


शिंदे गटाला केलं लक्ष्य


"आज मी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलो आहे. उद्या ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे. सध्याच्या राजकारणामध्ये जो काही विकृत आणि गलिच्छपणा आला आहे तो समोर दिसत असूनही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इथे आहेत. बाकी जे बिकाऊ आहेत कोणत्या भावाने विकले गेले हे तुम्हाला ठाऊक आहे. काश्मीरमध्येही 50 खोकेच्या घोषणा दिल्या जात आहेत. पण यामुळे महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी झालीय," असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लक्ष्य केलं.