लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मारहाणीचं कारण काय तर..
ना ओळख, ना कोणता वाद... तरीही तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण. उल्हासनगरमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपीला केली अटक
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एका तरुणाच्या हत्येने (Murder) खळबळ उडाली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन आरोपीने एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा जागीच (Young Man Death) मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि मृत तरुण एकमेकांना ओळखत नव्हते किंवा त्यांचं पूर्ववैमनस्यही नव्हतं. केवळ संतापाच्या भरात आरोपीने तरुणाची हत्या केली. (death of a young man in beating with a wooden stick)
काय आहे नेमकी घटना
उल्हासनगरमधल्या कॅम्प नंबर 3 इथली ही घटना आहे. निरंजन यादव नावाचा तरुण रात्री बारा वाजता कॅम्प नंबर 3 मधल्या फार्व्हर लाईन चौकातून जात होता. याचवेळी समोरुन येणारा अजय उर्फ अज्जू चौहाण याला निरंजनचा धक्का लागला. मुद्दामून धक्का मारल्याचा जाब विचारत अजय निरंजनशी वाद घालू लागला. संतापच्या भरात अजयने निरंजनला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत निरंजनचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर अजय तिथून फरार झाला.
या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकाला मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा त्यांना एक तरुण लाकडी दांडक्याने मृत तरुणाला मारहाण करत असल्याचं दिसलं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी अजय उर्फ अज्जू चौहाणला ताब्यात घेतलं. अजयने हत्याची केल्याची पोलिसांसमोर कबूल दिली. दरम्यान, मृत निरंजन हा खेमानी परिसरात राहणारा असून तो याठिकाणी का आला होता याचा अधिक तपास आता पोलीस करत आहे
वडिलांच्या उपचारासाठी मुलाची घरफोडी
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये आणखी एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे. आजारी असलेल्या वडिलांच्या उपचारासाठी मुलाने चोरीचा मार्ग पत्करला आणि त्याने घरफोडी केली. मात्र डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी त्याला अटक केली. वैभव मुरबाडे असं तरुणाचं नाव असून त्याने चोरलेले 5 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय.
डोंबिवली पश्चिमेकडील एका इमारती मधील घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याचा शोध करत असतांना वैभवला पोलिसांनी अटक केली.