उल्हासनगर  :  पेट्रोल डिझेलच्या दरांचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. परंतु वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याने आपल्या खास ग्राहकांसाठी चक्क 1 लीटर पेट्रोल देण्याची योजना आणली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. कोलमडलेले आर्थिक बजेट सावरण्यासाठी  लोकं प्रयत्न करीत आहेत. परंतु उल्हासनगरातील हातमाग वस्त्रे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने एक भन्नाट योजना ग्राहकांसाठी आणली आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींचा फायदा त्याने आपल्या व्यवसायासाठी करून घेतला आहे. उल्हासनगर कॅम्प दोन भागातील सिरू चौक परिसरात शीतल हॅण्डलूम नावाचे हातमाग वस्त्रविक्रीचे दुकान आहे. दुकानमालक ललित शेवकानी गेल्या 25  वर्षांपासून येथे व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानातून चादरी, पडदे आणि इतर वस्त्र खरेदी केल्यास त्या ग्राहकाला  1 लीटर पेट्रोल  मोफत मिळणार आहे. ग्राहकाने 1 हजार रुपयांची खरेदी केल्यास, शहरातील सेक्शन 17 एचपी पेट्रोल पंपाचे 1 लीटर पेट्रोलचे कूपन देण्यात येते. त्यावर ग्राहकाच्या वाहनाचा क्रमांकही नमूद केलेला असतो. या कूपनच्या आधारे पेट्रोल पंपावर ग्राहकाला 1 लीटर पेट्रोल दिले जाते. 


पेट्रोल - डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांना जादा वस्तू घेतल्यास विशिष्ठ सूट देण्याएवजी पेट्रोलची भेट द्यावी असा विचार व्यापाऱ्याचा मनात आला. यानुसार ही योजना सुरू करण्यात आल्याचे ललित सांगतात. काही दिवसातच 100 लीटरहून अधिक पेट्रोल भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले. उल्हासनगर आणि आजूबाजूच्या शहरात या भन्नाट योजनेची चांगली चर्चा आहे. खरेदीवर सूट रुपाने  मिळणाऱ्या पेट्रोलची भेट ग्राहकांना वेगळाच  आनंद देणाऱे  ठरत  आहे.