चंद्रशेखर भुयार, झी २४ तास, उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट वाटपासाठी अर्धा पावसाळा निघून गेल्यानंतर निविदा प्रक्रीया राबवण्यात आलीय. त्यामुळे आता हिवाळ्यात विद्यार्थ्यांना रेनकोट देणार का? असा सवाल विचारला जातोय. उल्हासनगर महापालिकेच्या शहरात २५ शाळा आहेत. यातल्या ३१०० विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठी रेनकोट देण्याची पालिकेची योजना आहे. मात्र आता पावसाळा संपत आला तरीही विद्यार्थ्यांना रेनकोट मिळालेले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षण विभागानं आता रेनकोट विकत घेण्याची निविदा काढलीय. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या साहित्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये भरण्याचा अध्यादेश असताना निविदा का मागवली? असा सवाल विचारला जातोय. त्यामुळे आता विद्यार्थी हिवाळ्यात रेनकोट घालून येणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मनोज शेलार यांनी विचारलाय.
  
महापालिका शाळांमध्ये ३१०० विद्यार्थी असताना ५३१४ रेनकोटसाठी निविदा काढण्यात आलीय. पटसंख्येत फेरफार होत असल्याची कबुली महापालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली आहे. तसंच चुकीच्या पद्धतीनं निविदा प्रक्रिया राबवली असेल तर आयुक्त करवाई करतील, असंही ते म्हणाले.



पावसाळा संपत आल्यानंतर अश्या प्रकारे रेनकोटची निविदा प्रक्रिया राबविणे म्हणजे महापालिकेचे वराती मागून घोडे असा प्रकार झालाय. मात्र स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचा उपयोग केला जात असेल तर हे नक्कीच संतापजनक आहे.