नाशिक : मुंबईतील हॉटेलला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला. त्यावरून हॉटेलच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. नाशिक शहरात नोंदणी नसणाऱ्या अनधिकृत हॉटेलची संख्या शेकडोंच्या घरात आहे.  त्या हॉटेलमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना आहेत की नाही याची माहितीच महापालिकेकडे नाही.


नाशिक शहरात यंत्रणा अजून झोपेतच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमला मिलमध्ये पबला लागलेल्या आगीमुळे मुंबई हादरली. त्यानंतर हॉटेलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मात्र नाशिक शहरात यंत्रणा अजून झोपेतच आहेत. नाशिक शहरात एकूण हॉटेल्स, बार किती? किती जणांकडे अग्निसुरक्षा यंत्रणा आहे? याची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही. 


 केवळ 72 हॉटेल्सची नोंद


शहरात शेकडो हॉटेल्स असताना मनपाकडे केवळ 72 हॉटेल्सची नोंद आहे. त्यातही फायर सेफ्टी यंत्रणा बसवणारी केवळ 70 ते 80 हॉटेल्स असल्याची कबुली खुद्द मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी दिली.


 यंत्रणांच्या कृपादृष्टीमुळे अनधिकृत हॉटेल्स


शहरात कोणतीही इमारत उभी करायची असेल तर त्याची माहिती महापालिकेला देणं बंधनकारक आहे. हॉटेलसंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंदणी आवश्यक आहे. फायर सेफ्टी ऑडीट बंधनकारक आहे. मात्र हॉटेल व्यावसायिक हे सर्व नियम धाब्यावर बसवत असल्याने कमला मिलसारख्या घटना वारंवार घडत आहेत. 


हॉटेल्स असोसिएशनकडे नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशे आणि मनपा हद्दीतल्या अडीचशे हॉटेल्सची नोंदणी आहे. मात्र यंत्रणांच्या कृपादृष्टीमुळे शहरात अनधिकृत हॉटेल्स, धाबे, हुक्का पार्लरचं पेव फुटलंय. त्याला वेळीच आवर घालण्याची गरज आहे. मुंबईतल्या घटनेनंतर आता तरी मनपा यंत्रणा जागी होणं अपेक्षित आहे.