भाजप नेत्याच्या घराचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना; 2 मजूर ठार
Nashik News Today: नाशिकच्या गंगापूर रोड येथील डिकेनगर, सावरकर येथे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Nashik News Today: नाशिकमध्ये एक भयंकर अपघात घडला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड येथील डिकेनगर सावरकर येथे भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. ( Nashik Wall Collapse)
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या घराचे काम सुरू असतानाच हा अपघात घडला आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.इमारतीच्या पाया भरणीसाठी बांधली जाणारी भिंत कोसळल्याने हा अपघात झाल्यानं परिसरात खळबळ उडालीय. भिंत कोसळल्यानंतर मलबा मजुरांच्या अंगावर कोसळला आणि ते दबले गेले. यातच ते जबर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर येतेय.या अपघाताच्या संदर्भात गंगापूर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय.अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
भिंत कोसळून झालेल्या अपघातानंतर पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित घटनेची माहिती घेत आहेत. त्यानंतरच या प्रकरणी सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भातील भंडारा येथेही अशीच एक घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. मतदान अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. लाखनी तालुक्यातील सामेवाडा ते पिंपळगाव सडक मार्गावरील ही घटना आहे.पहिल्या टप्प्या अंतर्गत लोकसभा निवडणुक घोषित झाले आहेत. त्यानिमित्ताने राज्यात अधिकाऱ्यांची कामे सुरू झाली आहेत. भंडारा - गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीअंतर्गत पोस्टल बॅलेट मतदान घेण्यासाठी चारचाकी वाहनाने जात असलेल्या मतदार अधिकाऱ्यांचे वाहन समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवताना अनियंञित होऊन रस्त्याखाली उतरले.सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून मतदान अधिकारी थोडक्यात बचावल्याची चर्चा केली जात आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील सामेवाडा ते पिंपळगाव सडक मार्गावर घडली.